आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सदस्य निवडीवरून शिवसेनेत दोन तास खल; लागली स्थायीची लॉटरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थायीवरील सदस्य निवडीवरून शिवसेनेत तब्बल दोन तासांहून अधिक काळ गोंधळ सुरू राहिल्याने प्रक्रियेत काही काळ खोळंबा झाला. अखेर तडजोड करून शिवसेना सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने महापौर अँड. यतिन वाघ यांनी 11 सदस्यांची निवड जाहीर केली.

पक्षांतर्गत सहमतीनंतर सुदाम कोंबडे, आर. डी. धोंगडे, रेखा बेंडकुळे, सुमन ओहोळ (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), हरिश्चंद्र भडांगे, सुनीता निमसे, कल्पना चुंबळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), अश्विनी बोरस्ते, शिवाजी गांगुर्डे (काँग्रेस), अँड. शिवाजी सहाणे (शिवसेना) व शबाना पठाण (अपक्ष) यांची निवड जाहीर करण्यात आली.

16 पैकी आठ सदस्य निवृत्त झाल्याने आणि तीन सदस्यांनी राजीनामे दिल्याने 11 सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यांच्या निवडीसाठी गुरुवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना वगळता अन्य पक्षांच्या गटनेत्यांनी महापौरांकडे आपापल्या सदस्यांची नावे महासभेपूर्वीच सादर केली होती. त्यामुळे सभा सुरू होण्याअगोदरच दहा सदस्यांची नावांची चर्चा सुरू झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांचे सभागृहातच इतर नगरसेवक अभिनंदन करीत होते. मात्र, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयात सेनेच्या सदस्य निवडीवरून खल सुरू असल्याने सकाळी साडेअकराला सुरू होणारी सभा एकपर्यंत सुरू होऊ शकली नव्हती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेते अजय बोरस्ते आदींसह इच्छुक असलेले शिवाजी सहाणे, विलास शिंदे, कोमल मेहरोलिया, वंदना बिरारी, सचिन मराठे, शैलेश ढगे आदींमध्ये चर्चा सुरू होती. त्यानंतर महापौरांच्या कार्यालयामध्ये बंद दाराआड चर्चा केली. मात्र, गोंधळ कमी होण्याऐवजी आणखी वाढत गेला.

अखेर सहा इच्छुकांमधून शैलेश ढगे व शिवाजी सहाणे ही दोनच नावे शिल्लक राहिल्याने दोघांपैकी कोणाची निवड होते, याविषयी उत्सुकता निर्माण झाली. सरतेशेवटी ढगे यांनी स्पर्धेतून माघार घेत सहाणे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे महासभा सुरू झाली. महापौर वाघ यांनी त्यांना मिळालेल्या यादीनुसार सदस्यांच्या नावांची घोषणा केली.

बिरारींच्या नावावर यंदाही फुली

पहिल्या वर्षी स्थायी समितीत निवड न झाल्याने वंदना बिरारी यांनी थेट माजी संपर्कप्रमुख अरविंद सावंत यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. त्यामुळे या वेळी त्यांची निवड निश्चित मानली जात होती. त्यानुसार, पक्षर्शेष्ठींकडून त्यांचे नावही कळविण्यात आले होते. मात्र, कोमल मेहरोलिया यांनीदेखील सदस्यपदावर हक्क सांगितल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे दोन्ही महिलांचे नाव मागे पडून ढगे, शिंदे, मराठे आणि सहाणे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. निवड एकच वर्षासाठी असल्याने चारपैकी तीन सदस्यांनीही माघार घेत सहाणे यांचे नाव सुचवले. बिरारी यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवतानाच वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य केला. बडगुजर यांनी सहाणे यांचे नाव सर्वांनीच एकमताने सुचवल्याचे स्पष्ट केले.

सदस्य निवडीवरून काँग्रेसमध्येही वाद

एरवी विविध मान्यवरांच्या जयंती, पुण्यतिथी यासह विविध कार्यक्रम साजरे करण्यामध्ये काँग्रेसमध्ये नेहमीच दोन गट दिसून आले आहे. एकमेकांना शह देत दोन्ही गट आजपर्यंत एकमेकांवर कुरघोडी करत आले आहेत. स्थायी समितीच्या निवडीतही हे दोन गट आमने-सामने आहेत. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सुचविलेल्या राहुल दिवे आणि योगिता आहेर यांच्या नावाला दुसर्‍या गटाने आक्षेप घेत थेट मुंबई गाठली. यानंतर झालेल्या घडामोडीनंतर स्थायीच्या सदस्यपदी शिवाजी गांगुर्डे यांची वर्णी लागली, तर अश्विनी बोरस्ते यांची निवड मात्र ज्येष्ठ सदस्य या निकषावरून झाल्याचे सांगण्यात येते.

सभापतिपदासाठी मुर्तडक यांची चर्चा

स्थायी समितीचे संभाव्य सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांचे नाव घेतले जात आहे. ठाणे, भिवंडी येथे शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या अटीवर नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवाराला सहकार्य करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर अद्याप उघड बोलले जात नसले, तरी शिवसेना-मनसे आणि भाजप अशी युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू आहे.