आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिजत घोंगडे: पीएचडीस मिळेना युजीसीचा ‘ग्रीन सिग्नल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या मुक्त विद्यापीठातील पीएच.डी.साठी इच्छुकांना वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून 25 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेश मिळू शकणार असल्याची घोषणा विद्यापीठातर्फे गेल्यावर्षीच नोव्हेंबरदरम्यान केली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी ) हिरवा कंदील मिळाला नसल्याने प्रतीक्षा कायम आहे.

ठप्प होण्याची कारणे
पीएच.डी. आणि एमफीलबाबत अन्नामलाईसह बहुतांश मुक्त विद्यापीठांकडून ‘सढळ हस्ते’ या मानद पदव्यांचे वाटप करण्यात आले होते. याबाबतचे वास्तव निदर्शनास आल्यानंतर नेमण्यात आलेल्या मुणगेकर समितीने ‘ओपन युनिव्हर्सिटींनी पीएच.डी. आणि एमफीलचे फ्लडगेट ओपन’ (जणू पीएच.डी. आणि एमफीलच्या पुराचा लोंढाच आणल्याचे) त्यांच्या अहवालात नमूद केले होते. त्यामुळे युजीसीने जुलै 2009 मध्ये मुक्त विद्यापीठांना एमफील आणि पीएच.डी.बाबत निर्बंध घातले होते.

पीएचडीसाठी हे राहणार बंधनकारक : मानद पदवी घेतल्याने समाजाचा किंवा कोणत्या विशिष्ट वर्गाचा काय फायदा होऊ शकणार आहे, त्याची माहिती संबंधित प्रवेशेच्छुक विद्यार्थ्याने देणे बंधनकारक केले जाणार आहे. पीएच.डी.सारख्या मानद पदवीचे अवमूल्यन होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी मार्गदर्शकांमार्फतच पीएच.डी. करण्याचे निर्बंध घातले जाणार आहेत. तसेच त्या मार्गदर्शकाने आणि संबंधित विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये किमान सहा महिने एकाच वेळी राहणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

येथे पीएचडी सुरूच
युजीसीने निर्बंध घातल्यानंतरही काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि कर्नाटक मुक्त विद्यापीठ या दोन विद्यापीठांनी त्यांचे पीएचडी सुरू ठेवण्यात यश मिळविले आहे. मात्र, अन्य मुक्त विद्यापीठांना ते साध्य करता आले नाही. त्यामुळे विद्यापीठ असूनही संशोधनाची मानद पदवी मिळविणे विद्यार्थ्यांना अशक्य झाले आहे.

नोटिफिकेशनची प्रतीक्षा
मुक्त विद्यापीठाला पीएचडी सुरू करण्याबाबत युजीसीकडून अद्याप नोटिफिकेशन किंवा सक्यरुलर प्राप्त झालेले नाही. नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतरच पीएचडी सुरू करता येईल.
-डॉ. आर. कृष्णकुमार , कुलगुरू, मुक्त विद्यापीठ