आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक - गर्भवती मुलीचा जन्मदात्या पित्यानेच घोटला गळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जन्मदात्या पित्यानेच गर्भवती मुलीचा निर्दयपणे दोरीने गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी गंगापूररोडनजीकच्या लोकमान्यनगर परिसरात घडली. पोलिसांनी तासाभरातच क्रूरकर्मा नराधम पित्यास अटक केली आहे. मुलीने वर्षभरापूर्वी केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे नातलग व रहिवाशांनी हिणविल्याचा राग मनात ठेवूनच आपण पोटच्या मुलीचा खून केल्याची कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली.

या घटनेत प्राण गमवावा लागलेल्या युवतीचे नाव प्रमिला दीपक कांबळे (19) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालविणारा व प्रसंगी इतर किरकोळ कामे करणारा एकनाथ किसन कुंभारकर (40, रा. मोरेमळा, जोशीवाडा) याने शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घराशेजारी राहणारा रिक्षाचालक प्रमोद आहेर यास उठवून आईची प्रकृती गंभीर असून, तिला प्रमिलाला भेटायचे आहे. महात्मानगर येथून तिला घरी आणायचे आहे, असे सांगून भाड्याने रिक्षा (एमएच.15.झेड 3174) ठरविली. मुलीच्या घरी गेल्यावर कुंभारकर याने तिची सासू, पतीस आजीने भेटायला बोलावल्याचे सांगून घरी पाठविण्यासाठी आग्रह धरला. त्यास पती व सासूने विरोध केला असता ‘आजीची प्रकृती गंभीर असून, तिची अखेरची इच्छा प्रमिलाला भेटण्याची आहे. तिला आमच्यासोबत पाठवा, मी थोड्याच वेळात घरी परत आणतो’, असे सांगितले. त्यांनी होकार दिल्यानंतर मुलीला सोबत घेऊन महात्मानगर येथून पंचवटीतील मोरेमळ्यात जाताना चोपडा लॉन्सच्या अलीकडे लोकमान्यनगर, सावकार हॉस्पिटलसमोर येताच त्याने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितली.

या हॉस्पिटलमध्ये प्रमिलाचा मामा असून, त्यास बोलावून आणण्यासाठी चालकास पाठविले. रिक्षाचालक आहेर हॉस्पिटलमध्ये जाताच या पित्याने नायलॉनच्या दोरीने क्रूरपणे मुलीचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण तो तोकडा ठरला. रिक्षाचालकानेही हा प्रसंग बघून पित्याला बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत आरडाओरड केली. मात्र, त्याने दोरी एकदम घट्ट पकडून रिक्षाचालकास ढकलून दिले. परिसरातील दोघा-तिघांच्या मदतीने रिक्षाचालकाने कशीबशी पित्याच्या तावडीतून मुलीची सुटका करून घेतली व तिला समोरच्या हॉस्पिटलमध्ये नेले. त्याच वेळी पित्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, डॉक्टरांनी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. तिकडे जात असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली.

वर्षभरापूर्वी झाला होता विवाह
मुलगी प्रमिला व दीपक यांचा वर्षभरापूर्वीच वणीत विवाह झाला होता. त्यास प्रमिलाच्या कुटुंबीयांनी विरोध केला. त्यावेळी दीपक कांबळे हा महात्मानगरला पाण्याच्या टाकीजवळ एका बंगल्याच्या आवारातील पत्र्याच्या शेडमध्ये आईसोबत राहात होता. सुरुवातीला सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा दीपक नंतर सातपूर भागात एका बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून कामाला लागला होता.

‘...नाही तर सुटल्यावर तिला मारून टाकीन’
प्रमिलाच्या हत्येनंतर क्रूरकर्मा एकनाथ कुंभारकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला ठाण्यात आणून चौकशी केली. मुलीने आंतरजातीय विवाह केल्यापासूनच डोक्यात राग होता. त्यात ती बाळंत होणार असल्याने संताप अनावर होत होता. त्यामुळे रात्री झोपतानाच तिला उद्या या जगात ठेवायचेच नाही, असे ठरवून हे कृत्य केल्याचे तो पोलिसांना सांगत होता. ‘बघा ती मेली की नाही, नाहीतर मी सुटल्यावर तिला मारूनच टाकेन,’ असेही तो पोलिसांसमोर बडबडत होता.

बाळंतपणाची तारीख जवळच
नऊ महिने पूर्ण होत असल्यामुळे डॉक्टरांनी तिची बाळंतपणाची तारीख दिली आहे. त्यामुळे तिला नेऊ नका, त्रास होईल, असे सांगून सासूने प्रमिलाला पित्यासोबत न पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पित्याने हट्ट करून तिला नेले आणि थंड डोक्याने तिची जीवनयात्रा संपविली. पोटच्या मुलीचा त्याने जीव घेतला, दोन-दोन जीव घेणार्‍या या नराधमास कठोर शिक्षा झाली पाहिजे, असा टाहो प्रमिलाच्या सासूने फोडला.

महिला कार्यकर्त्यांचा संताप अनावर
याला विकास म्हणतात का?
ही घटना ऐकल्यावर अगदी सुन्न व्हायला होतंय. व्यक्तीच्या आयुष्याला किंमतच उरली नाही. मुलीवर मालकी हक्क बजावतात लोकं. तिचं काहीतरी वैयक्तिक आयुष्य आहे, याचा विचारच केला जात नाही. कुठल्या खोट्या प्रतिष्ठा जपण्याची धडपड असते यांची. मुळात दोन जिवांना मारण्याचा अधिकार दिला कोणी याला, कुठे चाललंय जग, याला विकास म्हणतात का? अंजली उगावकर, वकील व सामाजिक कार्यकर्त्या

अशा घटनाच घृणास्पद
हे लग्न दोघांच्या संमतीने झाले होते, त्यात तिला दिवस गेलेले. कोणत्याच प्रकारे त्या माणसाला त्याच्या मुलीला त्रास देण्याचा अधिकार नाही. आजही नाशिकसारख्या प्रगत शहरात अशा घटना घडतात हे घृणास्पद आहे. एक सोडून दोन जिवांचा प्राण घेतला, ऐकूनही काटा येतो अंगावर.. अर्थात ती गर्भवती असल्याने प्रतिकार करू न शकल्याचा फायदा घेतला त्याने. अलका एकबोटे, सुगावा मिर्श विवाह मंडळ

पालकांनी मुलींचं सुख पाहावं
त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. हे कृत्य नक्कीच हेतुपुरस्सर केलेले आणि पूर्वनियोजित असणार. मुलींनी सक्षम व्हायला हवं. पालकांनी मुलीचं सुख पाहायला हवं, मुळात अशा प्रकारे प्रतिष्ठा जपण्यात काय अर्थ. मीनाक्षी मराठे, महिला हक्क संरक्षण समिती समुपदेशक

संयम बाळगा, सकारात्मक विचार करा..
या घटनेबाबत पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत प्रमिलाने प्रेमविवाह केल्याने व त्याबाबत परिसरातील रहिवासी तसेच नातेवाइकांमध्ये होत असलेली वक्तव्य, टोमणे यांमुळे तिच्या वडिलांच्या मनात राग निर्माण होऊन ही घटना घडल्याची बाब समोर आली आहे. अशा स्वरूपाच्या मानसिकतेबाबत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयंत ढाके सांगतात, ‘अशा स्वरूपाच्या घटना दुर्मिळ असून, बेभान अवस्थेतूनच असा प्रकार झाला असावा. काही व्यक्तींबाबत न केलेल्या कृत्याबद्दल नाहकच खजील होण्यासारखे, अपराधी वाटत असल्यासारखे प्रकार घडतात. त्यातून मनात पराकोटीचा राग निर्माण होऊन अशा स्वरूपाचा गुन्हा घडतो. नंतर त्याचा पश्चात्तापही होतो. मात्र, तोपर्यंत घटना घडून गेलेली असते. नातेसंबंधांमध्ये सहसा असे प्रकार होत नाहीत; परंतु असा एखादा प्रसंग आलाच तर अशा वेळी अबोल राहणेच योग्य. समाजातून होणार्‍या विधानांकडे दुर्लक्ष करावे. निर्थक गोष्टी मनावर घेऊ नये आणि संयम बाळगून सकारात्मक विचार करावा.’