आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या राक्षसाने माझ्या प्रमिलाचा जीव घेतला..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रमिलाला आम्ही निशा म्हणायचो. तिची आजी सिरियस आहे, असे सांगत माझा सासरा घरी आला. आजीची शेवटची भेट होण्यासाठी तरी तिला माझ्यासोबत पाठवा, म्हणून विनवू लागला. आम्हीही तिला नेहमी माहेरी जाते, त्याच विश्वासानं पाठविलं. ते जाताच सासू आली धावतपळत. पतीच्या मनात काळंबेरं आहे. कशाला तिच्याबरोबर पाठविले, अशी तिने विचारणा करताच काळजात धस्स झालं. आम्ही सगळे निशाला शोधायला निघालो; पण आमच्या संसारावेलीवर फूल उमलण्याआधीच याच बापानं तिचा जीव घेतला आणि सगळं संपलं. दीपक कांबळे ‘दिव्य मराठी’ला ही करुण कहाणी सांगत होता. त्यावेळी त्याला भावना अनावर झाल्या होत्या.

या दुर्दैवी प्रसंगामुळे पोटच्या मुलीला मारणार्‍या नराधम पित्याची मनस्वी चीड येत होती. ‘गवंडी म्हणून कामावर जायचो तेव्हा तिच्याशी ओळख झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर भेटीत नि मग लग्नापर्यंत झालं. लग्नाच्यावेळी दोघंही सज्ञान होतो. खरंतर तिची माझी जात वेगळी. तिच्या घरचे विरोध करतील असं वाटलं होतं. पण, तिचा बाप म्हणत असे, ‘आमची पोरगी घ्या ठेवून आता तुम्हीच’, तो असा राग मनात धरेल व नंतर वचपा काढेल, असं तो कधीच वागला नाही. सगळं कसं आलबेल होतं. प्रमिलाला आम्ही घरी निशा म्हणायचो. निशा आल्या-गेल्या प्रत्येकाला जीव लावायची. माझे सासू-सासरे लग्न झाल्यानंतर वर्षभरात कित्येकदा माझ्या घरी आले असतील, जेवले असतील. निशा सगळ्यांचं आनंदाने करायची. माझ्या आई-वडिलांनी तिला मुलगी मानलं होतं. सणासुदीला आम्ही एकमेकांच्या घरीही जायचो. एकत्र सण साजरे करायचो. पण, तिच्या बापाच्या डोक्यात एकाएकी काय शिरलं ते कळलंच नाही.

शुक्रवारी सकाळीच तो घरी आला, रडायला लागला, निशाची आजी सिरियस आहे, तिला निशाला शेवटचं पाहायचंय म्हणून डोळे भरून बोलायला लागला. आम्हीही ती नेहमी माहेरी जात असल्यामुळे बापाबरोबर मोठय़ा विश्वासानं पाठवलं. पण. जीव कसा हडबडला नाय त्याचा निशाचा गळा आवळताना. माझी सासू नंतर आली होती घरी धावतपळत. कशाला बापाबरोबर तिला पाठवली म्हणून ती विचारणा करू लागली. त्याच्या मनात काळंबेरं हाय म्हणून ती सांगत होती. ते कळताच ती व मी घाईघाईने सावरकर हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. मी तिला चोपडा लॉन्सजवळच्या पुलावर शोधायला निघालो, सासू हॉस्पिटलच्या परिसरात शोधायला गेली. पण, वेळ निघून गेली होती. त्या राक्षसानं निशाचा आणि तिच्या उदरात असलेल्या आमच्या बाळाचा जीव घेतला होता.

दोन दिवसांनी ती बाळंत होणार होती. मी कितीतरी स्वप्नं सजवली होती. परिस्थिती नसताना तिच्यावर खासगी दवाखान्यात आठ दिवसाला दोन हजार रुपये खर्चून उपचार करीत होतो. ती गेली अन् माझं आभाळ उजाड करून गेली. काय गुन्हा केला होता तिनं अन् मी? जात न पाहता एकमेकांवर प्रेम केल्याचा, एका बाळाला जन्म देणार होतो हा गुन्हा की आणखी काही?’ दीपकला अर्शू आवरेनासे झाले. त्याच्याबरोबर असलेले त्याचे दोन सुपरवायझर मित्रही त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त झाल्यानं हळहळत होते. ‘आता माझी लहान बहीण वनिता खूप रडणार, तिला कळाल्यावर. आताशी पहिलीत गेलीय ती. निशाचा तिला खूप लळा लागला होता. आता तिचे कोण लाड करेल’, असं विचारत दीपक हमसाहमशी रडत होता. सातवी पास असलेल्या दीपकला वर्षभर फक्त एकच भाषा कळत होती, सगळ्यांना जीव लावणार्‍या प्रमिलावर जीव ओतून प्रेम करण्याची..