आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती सभापती निवडणुकीत पोलिसांचा लाठीमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक पंचायत समितीच्या उपसभापतीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याने काँग्रेसच्या सदस्यांनी थेट मनसे-शिवसेनेच्या गोटातच धाव घेतली. एकाच वाहनातून हे चारही सदस्य पंचायत समितीच्या कार्यालयात निवडणुकीसाठी येत असताना आवारातच त्यांच्या वाहनाला मनसे-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडविल्याने शाब्दिक वाद झाला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी थेट लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मावळते सभापती अनिल ढिकले यांनी उपसभापतिपदासाठी दावेदारी केली. राष्ट्रवादीचे धनाजी पाटील यांनी ‘गेल्या वेळी तुम्हाला सभापतिपद मिळाल्याने आता मला समर्थन द्यावे’ असे म्हणत उपसभापती करण्याचा हट्टच धरला. त्यांच्यात एकमत न झाल्याने काँग्रेसचे सदस्य स्वतंत्र झाले. त्यातच प्रकाश बदादे यांनी तर प्रक्रियेतच भाग घेतला नाही. ढिकले यांनी स्वत:च्या वाहनातून मनसेच्या शोभा लोहकरे, सुशीला वाघले आणि शिवसेनेच्या सुजाता रूपवते यांना घेऊन येत ‘उपसभापती आपण होणार’ या अविर्भावात पंचायत समिती अावारात दुपारी १२ वाजता प्रवेश केला. मात्र, मनसेच्या दोन्ही सदस्यांना खाली उतरवावे, तसेच बदादे या वाहनात असल्याचा संशय घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही वाहन अडवीत वाद घातला.
सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्याने वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. स्थिती नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यात बदादे यांची पत्नी व मुलगा संजय यांनी ढिकलेंच्या वाहनासमोर उभे राहत बदादेंना उतरविण्याची मागणी केली. पण, बदादे वाहनात नव्हते. वाहन अडवल्याने पोलिसांनी संजय बदादे यालाही मारत ताब्यात घेतले. निवडणूक पार पडेपर्यंत पोलिसांच्या त्यांना वाहनात बसवून ठेवले.

सभापतिपदी मंदाबाई निकम अविरोध
नाशिक पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा नाशिकच्या महापौर निवडणुकीप्रमाणे ‘सत्तेसाठी कायपण’ याची पुनरावृत्ती झाली. सभापतिपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने एकमेव ओबीसी असलेल्या राष्ट्रवादीच्या मंदाबाई निकम यांची अविरोध निवड झाली. मनसे-शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्याने काँग्रेसकडून निवडून आलेले मावळते सभापती अनिल ढिकले यांची उपसभापतिपदी अविराेध निवड झाली.

पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी रविवारी निवडणूक झाली. सभापतिपद राखीव झाल्याने राष्ट्रवादीच्या मंदाबाई निकम यांची अविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी मात्र निवडणूक झाली. मागच्या वेळी काँग्रेसला सभापतिपद दिल्याने आता राष्ट्रवादीला मिळावे, यासाठी धनाजी पाटलांनी मागणी लावून धरली. काँग्रेसने सभापतिपद राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याने उपसभापतिपद काँग्रेसला देण्याचा हक्क धरला. त्यावर एकमत न झाल्याने काँग्रेसकडून मावळते सभापती अनिल ढिकले व राष्ट्रवादीकडून धनाजी पाटील यांनी अर्ज भरले. पंचायत समितीच्या आठ जागांपैकी ज्याचे पाच सदस्य तो उपसभापती होणार होता. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि एक अपक्ष कैलास चव्हाण त्यांच्यासोबत असल्याने त्यांचाच उपसभापती होणे अटळ होते. मात्र, ढिकलेंना ते मान्य नसल्याने त्यांनी थेट मनसे व शिवसेनेलाच सोबत घेतले.
स्वत: अनिल ढिकले, मनसेचे दोन आणि सेनेचा एक असे चार सदस्य त्यांच्य बाजूने झाले, तर काँग्रेसचे बदादे, राष्ट्रवादीचे दोन आणि अपक्ष एक असे चार जण धनाजी पाटील यांच्या बाजूने असताना बदादे गैरहजर राहिल्याने पाटील यांचा पराभव निश्चित झाल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ढिकलेंची अविरोध निवड झाली.