आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Police Academy Growth Security For Attempt Of Terrorist Attach

महाराष्‍ट्र पोलिस प्रबोधिनीच्या सुरक्षेत वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा दलाने पकडलेला लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अबू जिंदाल याच्या तपासात महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती पुढे आल्याने प्रबोधिनीची सुरक्षितता वाढविण्यात आली आहे. या संदर्भात पोलिस महासंचालक संजीव दयाळ सुरक्षिततेचा आढावा घेणार आहेत.
जिंदालने चौकशीत लष्कर-ए-तोयबाकडून महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली. त्यापाठोपाठ गेल्या आठवड्यात पुणे येथे बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील मॉल्स, सिनेमागृह, धार्मिक स्थळांची सुरक्षितता वाढविण्यात आली आहे. तसेच, पोलिस प्रबोधिनीच्या अंतर्गत सुरक्षेचा आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि संचालक संजय बर्वे, उपसंचालक डॉ. निखिल गुप्ता यांनी संयुक्तपणे आढावा घेतला.
प्रबोधिनीच्या दोनशे एकरांच्या जागेची पाहणी करीत बॉम्बशोध पथकाद्वारे तपासणीही करण्यात आली. आवाराला संरक्षक भिंत उभारण्यात आली असून, तिची उंची आणखी सहा ते सात फुटांनी वाढवून त्यावर तारेचे कुंपण घालण्याची सूचनाही करण्यात आली. याबाबत महासंचालकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, प्रबोधिनीच्या चारही बाजूकडील प्रवेशद्वारे बंद करून बाहेरच्या भागातही सुरक्षितता वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर, पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी मंजूर आराखडा, शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावावरदेखील महासंचालकांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या बैठकीस प्रबोधिनीचे संचालक, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आदी उपस्थित राहणार आहेत. महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच दयाळ यांच्या समवेत बैठक होणार असल्याने त्याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.