आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक पोलिसांचे ऑल आउट; धिंगाणा रोखण्यासाठी कोम्बिंग, 110 अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गटारी साजरी करणार्‍या मद्यपींचा धिंगाणा रोखण्यासाठी आणि सराइत गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी सायंकाळपासून ऑल आउट, कोम्बिंग ऑपरेशन राबवले. दोन तडीपार गुंडांसह चाकू घेऊन फिरणार्‍या युवकाला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत 110 जणांना प्रतिबंधात्मक कारवाई करीत अटक करण्यात आली.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या उपस्थितीत उपआयुक्त साहेबराव पाटील, संदीप दिवाण, नंदकुमार चौघुले, सहायक आयुक्त गणेश शिंदे व परिमंडळ दोनच्या हद्दीत उपआयुक्त डॉ. डी.एस. स्वामी, सहायक आयुक्त हेमराज राजपूत व सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, अधिकारी असे पाचशेहून अधिक कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअरबार, परमीटरूमजवळ पोलिसांनी गस्त वाढविली होती. आयुक्त सरंगल यांनी अधिकार्‍यांच्या सोबत जुन्या नाशकातील गंजमाळ, नानावली, पंचशीलनगर, भीमवाडी, भदक्राली आणि मल्हारखाण, जोशीवाड्यासह ठिकठिकाणी पाहणी केली. 30 टवाळखोर व 10 सराइत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.

दोन तडीपार ताब्यात : उपआयुक्त डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, सातपूर परिसरात सराइत गुन्हेगारांची शोध मोहीम घेण्यात आली. पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार केलेले दोन गुंड हाती लागले. 15 मद्यपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.