आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात शोभेल अशी पोलिसांची कामगिरी; केवळ चिठ्ठीवरून मृताच्या आप्तांचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी हाती काहीही नसताना या व्यक्तीची ओळख पटवायची व आपले कर्तव्य पूर्ण करायचे, असा दृढनिश्चय केलेल्या जमीर नाईक या पोलिस अधिकार्‍याला मृताची ओळख पटवण्यात यश मिळते. त्यामुळे कर्तव्य बजावल्याचे समाधान या अधिकार्‍याला लाभले. एरवी हद्दीचा वाद घालणार्‍या पोलिसांच्या तपास कामातील या कौशल्यामुळे नागरिक वाखाणणी करत आहेत.

औरंगाबादरोडवरील ओढा चौफुलीवर शुक्रवारी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडे कुठलीच माहिती नव्हती. आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शनिवारी आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष डौले यांनी उपनिरीक्षक जमीर नाईक यांच्याकडे घटनेचा तपास दिल्यानंतर त्यांनी प्रथम अपघातग्रस्त दुचाकी (एमएच 15, एफ 1950) मालकाचा शोध घेतला. मूळ मालकाने दुचाकी विकल्याने त्यालाही मृताबाबत माहिती देता आली नाही. नाईक पुन्हा शवागारात गेले त्यांना मृताच्या पँटच्या आतील खिशात चुरगळलेल्या कागदावर एक मोबाइल नंबर आढळला. तो नंबर लागला, मात्र फोन घेतलेल्या व्यक्तीने ‘अशा व्यक्तीस ओळखत नसल्याचे’ सांगितले.

नाईक यांनी त्या व्यक्तीस नाशिकला येण्याची विनंती केली. परंतु, त्याने येण्यास असर्मथता दाखविली. नाईक व संजय शिंदे यांनी सिन्नरला जाऊन विनंती केली ते येण्यास राजी झाले. त्यांनी मृतदेह बघताच तो नायगावचा भीमा लक्ष्मण बर्डे असल्याचे सांगितले. नाईक यांनी नातेवाइकांना माहिती कळविली. नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात येऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह नातेवाइकांकडे सोपवता आला त्यामुळे नाईक यांना समाधान वाटले.

अचानक शोध
मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत जिकिरीचे असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठलेही धागेदोरे न सापडल्याने बेवारस शव अशी नोंद होत असतानाच अचानक मृताच्या कपड्यात चुरगळलेला कागद व त्यावरील मोबाइल नंबर हाच ओळखीचा दुवा मिळाला आणि अखेर ओळख पटली. जमीर नाईक, उपनिरीक्षक आडगाव पोलिस ठाणे