आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पोलिसांच्या प्रयत्नांची दखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेने राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल अमेरिकेतील लॉ ऑफ स्कूल आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या प्रतिष्ठित संस्थांनी घेतली आहे. या संस्थेचे प्रतिनिधी मंगळवारपासून दोन दिवस शहरातील सुमारे 100 नागरिकांना भेटून सुरक्षिततेविषयीची त्यांची भावना जाणून घेणार आहेत.

नाशिक पोलिसांच्या या उपक्रमांचे कौतुक सामाजिक, औद्योगिक संघटनांनी यापूर्वीच केले आहे. सर्वाधिक गुन्हे घडणार्‍या राज्यातील आघाडीच्या शहरांमध्ये नाशिकचा वर्षभरापूर्वी समावेश होता. महिला, वृद्धांना लक्ष्य करीत त्यांचे दागिने लुटणे, रिक्षातील प्रवाशांची लूटमार, राजकीय आर्शय लाभलेल्या गुंडांकडून भरवस्तीत वाहनांची तोडफोड-जाळपोळ, दहशत पसरवणे अशा गुन्ह्यांचे सत्र शहरात सुरू होते.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पोलिस आयुक्तपदाचा पदभार कुलवंतकुमार सरंगल यांनी स्वीकारताच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला. पोलिस दलातील अपप्रवृत्तींना दूर ठेवत तडीपारी, मोक्का, झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. ऑलआउट, कोम्बिंग, नाकाबंदी यासारख्या मोहिमा सातत्याने राबवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे एक हजाराने गुन्ह्यांत घट झाली. गंभीर स्वरूपाची लूटमार, दरोडा, घरफोड्यांच्या गुन्ह्यात 65 टक्क्यांहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात यंत्रणेला यश आले.

या उपक्रमांची इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या नामांकित संस्थेच्या आंत्रप्रेनॉर विभागाचे सहाय्यक संचालक संतोष र्शीनिवास व लॉ ऑफ स्कूल न्यूयॉर्क रिसर्च असोसिएटचे सुचित अंबाडापुडी यांनी दखल घेतली. नाशिक पोलिसांनी काही महिन्यांत गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याच्या दिशेने हाती घेतलेल्या कार्यपद्धतीचे संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्योजक संजय लोढा यांनी या प्रतिनिधींना माहिती उपलब्ध करून दिली.

आंत्रप्रिनॉर परिषदेत अहवाल प्रसिद्ध
या संशोधनाचा संपूर्ण अहवाल 23 फेब्रुवारीला ताज हॉटेलमध्ये होणार्‍या आंत्रप्रिनॉर परिषदेत प्रसिद्ध केला जाणार आहे. परिषदेस देशभरातील मोठमोठय़ा उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यापाठोपाठ, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस व अमेरिकन लॉ स्कूलमध्येही सादरीकरण करण्यात येणार आहे. पोलिस दलाचे मनोबल उंचावण्याबरोबरच नाशिकचे वातावरण उद्योगांसाठी किती उपयुक्त आणि नागरिकांसाठी भयमुक्त आहे, हे दाखवण्यासाठी हा प्रयत्न आहे.
-संजय लोढा, संचालक, शेल

या बाबींचा करणार अभ्यास
श्रीनिवास व अंबाडापुडी दोन दिवसांत विविध ठिकाणी भेट देणार असून, त्याचबरोबर शहरातील उद्योजक, व्यापारी, निमा-आयमाचे पदाधिकारी, आमदार, नगरसेवक, झोपडपट्टीतील महिला, महाविद्यालयांचे प्राचार्य, विविध शाखांचे विद्यार्थी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक व सामाजिक संघटनांच्या निवडक प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. पोलिसांची वर्तणूक, गुन्हे कमी होण्याची कारणे, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी, तसेच पोलिस-नागरिक संबंध, गुन्हेगारीचा उद्योग-व्यवसायावर होणारा परिणाम याचा आढावा ते घेणार आहेत.