आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकातही पोलिस भरतीचा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंबईतील पोलिस भरतीत पाच उमेदवारांचे बळी गेल्यानंतरही या प्रक्रियेत सुधारणा होत नसल्याचा अनुभव येत आहे. नाशिकमध्ये लेखी परीक्षेसाठी रविवारी पहाटे पाच वाजेपासूनच हजर झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्षात दुपारी 12.30 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आली. तोपर्यंत म्हणजे तब्बल सात तास हे उमेदवार भर उन्हात ताटकळत होते.

उच्च न्यायालयाने शासनाला भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देश दिले असताना त्याचेही उल्लंघन झाल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून येत आहेत.

नाशिक पोलिस आयुक्तालयातील 424 पदांसाठी 6 जूनपासून प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये दररोज 900 उमेदवारांना मैदानी चाचणी, शारीरिक व कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात येत होते. प्रत्यक्षात 600 ते 700 उमेदवारांनी हजेरी लावली असून त्यातील किमान 150 ते 200 उमेदवार पहिल्याच फेरीत बाद झाले. पहिल्या दिवशी 100 मीटर धावण्याच्या चाचणीत अंतर कमी असल्याची तक्रार आल्याने प्रशानसाकडून नव्याने चाचणी घेण्यात आली. मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या 4281 उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी रविवारी सकाळी 6 वाजता ओळखपत्रासह हजर राहण्यास सांगण्यात आले. उमेदवारांनी वेळेपूर्वीच पहाटे 5 वाजेपासूनच गर्दी केली होती. मात्र, उमेदवारांना दीड तासानंतर 7. 30 वाजता मैदानावर प्रवेश देण्यात आला. सुरुवातीला केटीएचएम महाविद्यालयात परीक्षा असल्याचे सांगितले जात होते. अचानक दुपारी 12 वाजता मैदानावरच आसनव्यवस्था करण्यात आली. सकाळी 7 वाजेपासून मैदानवर परीक्षेच्या प्रतीक्षेत बसलेल्या उमेदवारांना 12.30 वाजता उत्तरपत्रिका वाटप करून प्रत्यक्षात एक वाजता पेपर सुरू झाला.

दरम्यान, डमी परीक्षार्थी बसू नये म्हणून प्रत्येकाचे ओळखपत्र, स्वाक्षरी, छायाचित्र तपासणीमुळेच विलंब झाल्याचा दावा पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांनी केला आहे.

उन्हामुळे भोवळ
पोलिस यंत्रणेतील भोंगळ कारभाराचा उमेदवारांना चांगलाच फटका बसला असून तब्बल सात तास भरउन्हात ताटकळत राहावे लागले. काही उमेदवार भोवळ येऊन खाली पडल्याचे बोलले जात आहे. काहींना तातडीने पोलिसांनी सावलीत बसवल्याचे उमेदवारांनी सांगितले.