आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांना विद्यार्थ्यांची ‘छडी’; परीक्षांवरील बहिष्कार मागे घ्या, विद्यार्थी संघटनेनेचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्राध्यापक संघटनांनी परीक्षांवरील बहिष्कार मागे घ्यावा, या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांना हार अर्पण करीत गांधीगिरी पध्दतीने ‘छडी’ भेट देऊन मंगळवारी आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह दोनशे कार्यकर्त्यांनी अचानके एचपीटी महाविद्यालयात प्रवेश करत प्राचार्यांना घेराव घालत प्राध्यापक संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली. प्राध्यापकांचे आंदोलन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी असले तरीही यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात परीक्षांवर बहिष्कार घातल्यास शैक्षणिक समस्येचीही मोठी भर पडेल. त्यामुळे प्राध्यापकांनी अन्य तोडगा काढत विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार नाही याचा विचार करत आपले आंदोलन मागे घ्यावे, अशी मागणी करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी छडी आंदोलन छेडण्यात आले. त्यात प्राचार्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी धाक देण्यासाठी उपयोगी असलेली छडी देण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यभर हे आंदोलन छेडले आहे. राष्ट्रवादीने विनंती केल्यानंतर मराठवाड्यात प्राध्यापकांनी आंदोलन मागे घेतले. प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवल्यास राष्ट्रवादीच्यावतीने आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाघ यांनी सांगितले. आंदोलनात अतुल कोठावदे, प्रशांत मांडवडे, डॉ. किरण देशमुख, शादाब सय्यद, नवराज रामराजे, विजय बागुल, आदित्य थोरात, समीर भगत, सागर फडोळ, नीतेश निकम आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.