आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Pune Highway,Latest News In Divya Marathi

नाशिक-पुणे मार्गासाठी घेणार गडकरींची भेट; या सप्ताहात मांडणार सर्वसमावेशक प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक-पुणे महामार्गाच्या कामात अडथळा ठरलेला भूसंपादनाचा विषय मार्गी लागावा, यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय भूपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची याच आठवड्यात भेट घेऊन त्यांच्यापुढे मांडण्याचा निर्णय रविवारी विविध संघटनांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
नाशिक इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा) पुढाकाराने निमा हाउस येथे रविवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, नूतन अध्यक्ष रवी वर्मा, सरचिटणीस मंगेश पाटणकर, क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष अनंत राजेगावकर, सिटीझन फोरमचे अध्यक्ष जितूभाई ठक्कर, शेतकरी कृती समितीचे अँड. शरद गायधनी, संदीप भदाणे, प्रकाश वैरागडे, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, व्हिनस वाणी, एमआयडीसीचे उपअभियंता पी. के. पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक-पुणे महामार्गावरील चेहडी बंधारा ते शिंदे गावाची हद्द अशा चार किलोमीटर अंतरावरील भूसंपादन होऊ न शकल्याने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. या भागात सत्तरच्या आसपास शेतकर्‍यांच्या जमिनी येत असून, जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नसल्याने भूसंपादन होऊ शकले नाही. या भागात नाशिकहून पुण्याकडे जाताना उजव्या बाजूनेच 25 मीटरचे भूसंपादन करण्यात येणार असून, याला शेतकर्‍यांचा विरोध आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूने भूसंपादन केले जावे, दरातील फरक दूर करण्यात यावा आणि रस्त्याची रचना काही अंशी बदलावी, अशी मागणी या वेळी शेतकर्‍यांनी केली. निमाच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष व्हिनस वाणी, सिन्नरचे अतिरिक्त सचिव आशिष नहार, उत्तम दोंदे, पुंजाभाऊ सांगळे, शरद गायधनी, गिरीश पालवे आदी उपस्थित होते.