आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरली मालगाडी अन् चंगळ खासगी प्रवासी वाहतूकदारांची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी: पाडळी रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून आलेल्या संधीचे खासगी प्रवासी वाहतूकदारांनी सोने केले. कोणी दामदुपट व तिपटीने भाडे आकारणी करण्याची स्पर्धा पाहावयास मिळाली. वेळेचे महत्त्व पाळण्यासाठी प्रवाशांनीही या लुटीला मूक संमती दिली.
19 जानेवारीला मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले अन् चाकरमान्यांसह प्रवाशांची दैनंदिनी कोलमडली. मुंबई तसेच भुसावळकडे धावणार्‍या गाड्या दुसर्‍या दिवशीही उशिराने धावत होत्या. दररोज रेल्वेने अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांना अपघाताच्या वृत्ताने वेगळी वाट चोखाळण्यास भाग पाडले. इगतपुरी रेल्वेस्थानकात थांबण्यापेक्षा नाशिकला जाणार्‍या प्रवाशांनी खासगी काळी-पिवळी टॅक्सी, व्हॅनचा आधार घेतला. इगतपुरी ते नाशिक प्रत्येकी 40 रुपये प्रवासी भाडे आहे. मात्र, अपघाताच्या घटनेमुळे उखळ पांढरे करून घेत वाहतूकदारांनी प्रवासी भाड्यांमध्ये प्रासंगिक वाढ केली. प्रत्येकी 50 ते 100 रुपयांपर्यंत भाडे आकारले गेले. एका वाहनात आठ ते दहा प्रवासी कोंबण्यात आले. या अवैध वाहतुकीकडे पोलिस प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. जादा दराने भाडे आकारणार्‍या वाहनचालकांची तक्रार करावी कोणाकडे, याबाबत प्रवाशांना माहिती नसल्याने मागणीनुसार पैसे देण्याचा अनेकांनी पर्याय स्वीकारला.