आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा शॉर्टकट होणार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईच्या धर्तीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन यांच्या दोन्ही ट्रॅकच्या मधोमध 750 मीटर लांबीची लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे. या जाळीमुळे प्रवाशांच्या रूळ ओलांडण्याला आळा बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा शॉर्टकट बंद होणार आहे. अपघात आणि गुन्ह्यांच्या संख्येतही घट होण्यास यामुळे मदत होणार आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रवासी आणि रेल्वेगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य प्रवेशद्वार हे फलाट क्रमांक एकवर आहे. फलाट दोनवर उतरणारे बहुतांश प्रवासी हे दादराचा (पूल) वापर न करता सर्रास धोका पत्करून थेट रुळावरून फलाट एकवर येतात. भविष्यात असे धोकादायक प्रकार होऊ नयेत, यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या अधिकार्‍यांनी फलाट एक आणि दोनमधील दोन्ही ट्रॅकच्या मधोमध 750 मीटर लांबीची जाळी बसविण्याचा प्रस्ताव नुकताच भुसावळ येथील विभागीय अधिकार्‍यांकडे पाठविला आहे. त्यामुळे फलाट क्रमांक दोन आणि तीनवर उतरणार्‍या प्रवाशांचा शॉर्टकट लवकरच बंद होणार आहे. रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून वारंवार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेस्थानकात ग्रामीण भागासह शहरी भागातील नवीन प्रवासीही रूळ ओलांडतात, असे निदर्शनास आले आहे.

अपघातांना बसेल आळा
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील दोन्ही फलाटांमध्ये लोखंडी जाळी बसविल्याने रेल्वे रूळ ओलांडताना होणार्‍या अपघातांना आळा बसेल. अनेक महिलाही बालकांना घेऊन बिनधास्त रूळ ओलांडतात, तेव्हा भीती वाटते. रेल्वेने हे काम त्वरित सुरू करावे व अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालावा. - कल्याण देवळाणकर, प्रवासी

रूळ ओलांडण्यात महिला आघाडीवर
फलाट दोन आणि तीनवर उतरणार्‍या आणि फलाट क्रमांक एकवर रूळ ओलांडून येणार्‍या प्रवाशांमध्ये महिला आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, आपल्याजवळ असलेल्या लहान बालकांना घेऊन त्या रूळ ओलांडतात. रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने भविष्यात या अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

हे होणार फायदे

  • फुकट प्रवास करणार्‍यांवर नियंत्रण येणार
  • अपघातांवर येणार नियंत्रण
  • दादरावरून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांवर राहणार सीसीटीव्हीची नजर

फलाट एक आणि दोन यांच्यामध्ये रेल्वे प्रशासन बसविणार 750 मीटर लांबीची लोखंडी जाळी; विभागीय अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला