आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस 54 मिमी; पाणी तुंबले पाच फूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुरुवारी नाशिककरांना दणदणीत सलामी देणार्‍या पावसाने महापालिकेच्या भुयारी गटार योजनेबरोबरच पावसाळीपूर्व कामांकडे केलेल्या दुर्लक्षाचे पितळच उघडे पाडले. पाऊस 54 मिलिमीटर इतका झाला; पण त्यामुळे शहरात ठिकठिकाणी अध्र्या फुटापासून तब्बल पाच फुटांपर्यंत पाणी तुंबले. त्यामुळे लोकांची घरे, दुकाने, व्यापारी आस्थापना येथे साचलेला गाळ उपसण्याची कसरत शुक्रवारी सुरू होती. काही भागात लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली, तर काही भागात अधिकार्‍यांनी. मात्र, लोकांच्या संतप्त भावनांपलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. काही ठिकाणी लोकांनी स्वत: मोजपट्टीने पाणीपातळी मोजत पालिकेच्या बारभाई कारभाराबाबत खदखद व्यक्त केली. ज्या-ज्या ठिकाणी पाणी तुंबले होते, तेथे प्रत्यक्ष जाऊन ‘दिव्य मराठीच्या चमू’ने पाहणी केली व साचलेल्या पाण्याच्या पातळीलाही मोजपट्टी लावली, त्याचा हा वृत्तांत..


नाशिक शहरात सर्वाधिक पाणी सराफ बाजारातील जुन्या वाहनतळाजवळ साचले. पाच फुटांपर्यंत पाणीपातळी गेल्याने चारचाकी वाहने बुडाली, तर तळमजल्यावर दुकानेच दिसेनाशी झाली. पाणी काढण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत नागरिकांची शिकस्त सुरू होती. मोटार लावून पाणी काढले जात होते. दरम्यान शुक्रवारी पाऊस झाला नाही तर शनिवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

दहीपूल, मेनरोड या भागात उतार असल्यामुळे पाणी सरळ सराफ बाजाराकडे तसेच गोदावरीत जात होते. वास्तविक, हे पाणी रस्त्यालगत खोलगट भागात साचू नये म्हणून ढापे बसविले आहे. लोखंडी जाळ्यांमधून पाणी थेट भुयारी गटारीत जाण्याची व्यवस्था असली तरी प्रत्यक्षात या लोखंडी जाळ्या स्वच्छ करण्याची तसदीही अधिकारी, कर्मचार्‍यांनी घेतली नाही. रस्ता स्वच्छ करण्यासाठी सफाई कर्मचारी फिरकत नसल्यामुळे घाण जाळ्यात तुंबून राहिली.

चुकीची भूमिगत गटार हेच मुख्य कारण

6 जून रोजी पडलेल्या मुसळधार पावसाच्या निमित्ताने शहरात मध्यवर्ती भागात पावसाचे पाणी साचण्याचे प्रमुख कारण पुढे आले आहे, ते म्हणजे सर्मथनगर येथून महापालिकेने टाकलेली भूमिगत गटार. ही गटार सीबीएस, खडकाळी जंक्शन, सारडा सर्कल येथून पुढे अमरधाममार्गे गणेशवाडी येथे जोडण्यात येणार होती. मात्र, ती खडकाळी येथून पुढे न नेता भद्रकालीतून सरस्वती नाल्याला जोडण्यात आली. आता याच नाल्याच्या बॅकवॉटरमुळे गटारीचे सांडपाणी पुन्हा शहराकडे येत असल्यानेच सराफ बाजार, भद्रकाली, मेनरोड, कॉलेजरोड या भागात पाणी साचत असल्याची बाब नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी निदर्शनास आणून दिली.

विजेच्या लपंडावाने उद्योगांवर परिणाम

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी 18 वेळा वीज गेली, तर सातपूर औद्योगिक वसाहतीतील काही सेक्टरमध्येही हीच स्थिती होती. विद्युत जनित्रात बिघाड झाल्याने शहराचा वीजपुरवठा वळविण्यात आला होता. त्यामुळे वीज ये-जा करण्याचे प्रमाण जास्त असल्याने ही स्थिती उद्भवली. मात्र, शुक्रवारी सायंकाळी यात सुधारणा झाल्याचे महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रतन सानुले यांनी सांगितले.

येथेही तुंबले पाणी

> त्र्यंबकरोडवरील जिल्हाधिकार्‍यांच्या निवासासमोरील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्या गंगोत्री बंगल्यात 18 इंच पाणी तुंबले होते.

> शरणपूररोड, राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित सेंटर इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या दुकानात एक फूट आणि चार इंच पाणी होते.

> गंगापूररोडवरील आकाशवाणीलगतच्या विठ्ठल मंदिराजवळ दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले.

> तिबेटियन मार्केटमध्ये 20 इंच पाणी शिरले.

> उंटवाडीजवळील म्हसोबा मंदिराजवळ दीड ते दोन फूट पाणी होते.

> सिडकोत शिवाजी चौकातील एन-1, ए- 25 या अश्विन सेक्टर भागात बसस्टॉपजवळ एक ते दीड फूट पाणी होते.

> मुंबई नाक्यावरील उड्डाणपुलालगत दोन फूट पाणी होते.

> गांधीनगर परिसरातील प्रेस कामगार वसाहतीतही सुमारे अडीच फूट पाणी साचले होते.