आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंत्राटदारांचे पोषण हेच पालिकेचे धोरण, आमदार गितेंनी अधिकार्‍यांना सुनावले खडे बोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - महापालिका प्रशासनाने शहरविकासासह नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत पूर्णवेळ ठेकेदारांना पोसण्याचेच धोरण अवलंबले असल्याची टीका करीत दोन दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजवावे, असे खडे बोल आमदार वसंत गिते यांनी शनिवारी अधिकार्‍यांना सुनावले. कामे मंजूर नसतील तर कार्योत्तर मंजुरी घ्या व अडचण आल्यास महापौर-आयुक्तांशी पत्रव्यवहार करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

साथीचे रोग, रस्त्यांची झालेली चाळण या पार्श्वभूमीवर सातपूर विभागीय कार्यालयात शनिवारी तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिकार्‍यांना उद्देशून गिते म्हणाले, ‘‘वृत्तपत्रांत दररोज खड्डे, कचरा, रोगराईच्या बातम्या येतात, त्या सत्यही आहेत. मग तुम्हाला स्वत:हून कामे करण्याचे सूचत नाही का? प्रशासनाच्या चुकीमुळे लोकप्रतिनिधींची बदनामी होते.’’

‘‘ठेकेदारांना कामे देताना अनेक निकष लावलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांच्याकडून कामे करून घ्या; अन्यथा कर्तव्यात कसूर केल्याबाबत तुम्हालाच जबाबदार धरण्यात येईल,’’ असा इशारा महापौर यतिन वाघ व उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी या वेळी दिला. स्थायी सभापती रमेश धोंडगे यांनी घंटागाडीवर विभागीय स्वच्छता निरीक्षक, त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व सुपरवायझर यांचे भ्रमणध्वनी क्रमांक टाकण्याचे आदेश दिले. भरपावसाळ्यात दुष्काळासारखी स्थिती असून, पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याबाबत सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी सांगितले.

आमदार नितीन भोसले म्हणाले की, मोकळ्या जागांवर पाण्याची डबकी साचून डासांची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकले जाते. अशा बिल्डर व मिळकतधारकांना नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. बस थांब्यांवर अन्य जाहिरातींऐवजी पालिकेनेच प्रबोधनात्मक जाहिराती लावाव्यात, अशी सूचना आमदार नितीन भोसले यांनी केली. प्रभाग सभापती विलास शिंदे म्हणाले की, मलेरिया विभागाचे कर्मचारी पटावर तीस दाखविले जातात, प्रत्यक्षात कामावर 20-22 असतात. त्यातील काही रजेवर असतात. त्यामुळे योग्य फवारणी होत नाही. फवारणीची औषधेही प्रभावी नसतात. काही कर्मचार्‍यांना कामाच्या सोयीने दुसरीकडे पाठवले असून, त्यांना मूळ सेवेत काम करण्याचे आदेश देण्याची मागणी सभापती विलास शिंदे यांनी केली.