आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका ते नाशिकरोड रस्त्याच्या सहापदरीकरणात भुयारी मार्ग, फुटवेला मंजुरीच नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - थाटामाटात भूमिपूजन झालेल्या द्वारका ते नाशिकरोड या साडेपाच किलोमीटर सहापदरी रस्त्याच्या आराखड्यात चौक व शाळा-महाविद्यालयांसमोर भुयारी मार्ग आणि फुटवेला मंजुरी नसल्याने अपघाताचा धोका कायम राहाणार आहे. सध्याचे सिग्नल कायम ठेवून इतर ठिकाणी महामार्ग पंचरबाबतचा निर्णय होणार आहे. रुंदीकरण वगळता आराखड्यात अपघाताला आळा बसण्यासाठी कोणतेही नियोजन नाही.

नाशिक-पुणे महामार्गावर वाढत्या अपघातांमुळे केलेल्या सव्र्हेत काठे गल्ली, फेम थिएटर, उपनगर व दत्तमंदिर चौकात मोठय़ा प्रमाणात रहदारी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळेच रस्ता रुंदीकरणात या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळाली. 14 जूनला उड्डाणपुलाच्या उद्घाटनाबरोबरच या रस्त्याचे भूमिपूजनही समारंभपूर्वक झाले. द्वारका ते दत्तमंदिर चौक (स्वा. वि. दा. सावरकर उड्डाणपूल प्रवेशापर्यंत) या महापालिका हद्दीतील रस्त्यावर साडेआठ कोटी खर्च होणार आहेत. सध्या हा रस्ता चारपदरी असून, शहरातील वर्दळीसह पुणे, शिर्डी, अहमदनगरकडे व मुंबईकडील वाहतुकीमुळे तो अपुरा पडत आहे.

इथे आहेत चौक : द्वारकापासून पुढे काठे गल्ली, पौर्णिमा, बोधलेनगर, फेम चित्रपटगृह, शिवाजीनगर, आंबेडकरनगर, डीजीपीनगर, गांधीनगर, उपनगर, घंटी म्हसोबा मंदिर, अंधशाळा, शिखरेवाडी, गुरुद्वारा या चौकांचा रस्त्यात समावेश आहे. यापैकी काठे गल्ली, फेम चित्रपटगृह व दत्तमंदिर चौकात वाहतूक सिग्नल आहेत.

मार्गावरील शाळा
मार्गावर सेंट झेवियर्स हायस्कूल, के. जे. मेहता हायस्कूल, बिटको महाविद्यालय, जयरामभाई हायस्कूल, जेडीसी बिटको हायस्कूल ही शाळा-महाविद्यालये आहेत. याठिकाणी दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी शाळा-महाविद्यालय भरताना व सुटताना विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे अशक्य होते. वाहतूक पोलिस व सिग्नलअभावी येथे नेहमी अपघात होऊन काही विद्यार्थ्यांचा हकनाक बळीही गेला आहे. यामुळे या रस्त्याचे सहापदरीकरण होताना या बाबीही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

भुयारी मार्ग, फुटवे व्हावा
महामार्गावरील अपघातांची संख्या लक्षात घेता किमान शाळा-महाविद्यालयांसमोर तरी भुयारी मार्ग फुटवे करावा, ही जुनी मागणी आहे. शहरातील सर्व शाळांमधील शेकडो विद्यार्थी, शिक्षकांचा मोर्चा काढून प्रशासनास ही गंभीर बाब लक्षातही आणून देण्यात आली होती. बंटी कोरडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

आताच हवे नियोजन
काळाची गरज ओळखून रस्ता रुंदीकरण होत असले तरी चौक व शाळा-महाविद्यालयांसमोर होणारे अपघात टाळण्यासाठी फुटवे, भुयारी मार्गाचे नियोजन कामास सुरुवात करतानाच अपेक्षित आहे. सावन देवरे, व्यावसायिक

प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा
सध्याचे वाहतूक सिग्नलचे चौक कायम ठेवून दुतर्फा एक लेन वाढवण्यास सहापदरी रस्ता रुंदीकरणास तूर्त मंजुरी मिळाली आहे. चौकांपैकी मोजक्याच ठिकाणी रस्ता मोकळा ठेवला जाईल. शाळा-महाविद्यालयांसमोर भुयारी मार्ग, फुटवेला मंजुरीसाठी दिल्लीस पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. अन्यथा, पावसाळ्यानंतर सध्याच्या आराखड्यानुसार कामास प्रारंभ होईल. महापालिका त्यांच्या पातळीवर यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असली तरी त्यांच्यासमोर निधीचा प्रश्न आहे. - दिनेश महाजन, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50