नाशिक - महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाच्या कामांचा लाभ वाहनधारकांपेक्षा हातगाड्यांवरील विक्रेत्यांनाच अधिक होतो आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या सत्ताधारी मनसे-भाजप व प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जातो आहे.
महापालिकेत सत्तेत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दीड वर्षानंतर का होईना रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरण कामांचे स्मरण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे. वर्षांनुवर्षे रखडलेल्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्या निमित्ताने व्यक्त होत होती. विशेषत: सिडकोच्या संभाजी चौक ते उंटवाडी पूलादरम्यानच्या रूंदीकरणावेळी काही वेळासाठी हटलेले हातगाड्यांचे अतिक्रमण खडीकरणानंतर काही दिवस उलटत नाही, तोच कायम झाले आहे. या ठिकाणी पुन्हा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. आता पुन्हा या रस्त्यावर डांबरीकरणाची कामे पूर्ण केल्यानंतर दोन्ही बाजूला रस्त्याची रूंदी वाढून वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या रस्त्याच्या दुतर्फा फळे, भाजीपाला विक्रेत्यांबरोबर गॉगल, ऑईल व कपडे विक्रेत्यांनी हातगाड्यांवर दुकाने थाटले आहेत. यामुळे निम्याहून अधिक रस्ता अतिक्रमणाच्या विळक्यात सापडला आहे.
प्रभागातील मनसेच्या दोन्ही नगरसेवकांच्या साक्षीने प्रशासनाकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामे होऊनही तेही अतिक्रमण हटविण्याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. यामुळे रहिवासी, वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मनपा प्रशासन, सत्ताधार्यांच्या भूमिकेमुळे रसत्यांचे डांबरीकरण नेमके वाहतूक सुरळीत होण्यासाठी केले की अतिक्रमित व्यावसायिकांची सोय व्हावी, असा सवाल उपस्थित होतो आहे.