आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर पडला भलामोठा खड्डा; दोघांचा अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिका प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा रविवारी पुन्हा एकदा उघडकीस आला असून, उंटवाडी परिसरात उच्च दाबाची जलवाहिनी फुटल्याने रस्त्याच्या मधोमध तब्बल दहा फूट खोलीचा भलामोठा खड्डा पडला. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. विहिरीसारख्या दिसणार्‍या या खड्डय़ामुळे सायंकाळच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झाली होती.

शहरातील खड्डय़ांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त असतानाच, सिटी सेंटर मॉलसमोरील रस्त्यावर पडलेल्या विशाल खड्डय़ामुळे नाशिककरांच्या संतापात भर पडली. या रस्त्यावर सुमारे दहा फूट खोलवर पवननगर जलकुंभाला जोडणारी उच्च दाबाची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचे वेल्डिंग रविवारी पहाटेच्या सुमारास निघाल्याने त्यातून सुमारे 40 फूट उंचीचा फवारा उडाला, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. रविवारच्या सुटीमुळे सायंकाळी मॉलमध्ये येणार्‍यांची गर्दी झाली होती; परंतु याच परिसरात हा खड्डा असल्याने सायंकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, सकाळी 9 वाजेच्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिका कर्मचार्‍यांनी हाती घेतले. जेसीबीच्या साहाय्याने खड्डा वाढवून मग दुरुस्तीचे काम दुपारी 3 वाजेपर्यंत हे पूर्णत्वास नेले.

दोघांचा अपघात; पाण्यामुळे बचावले
पहाटे 5 वाजेच्या सुमारास कामानिमित्त पोलिस ठाण्यात जात असताना रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी दिसले. जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येताच मी खड्डय़ाच्या आजूबाजूला दगड आणि बॅरिकेड्स लावले; परंतु त्यादरम्यान प्रशांत चव्हाण नावाचा सायकलस्वारही त्यात पडला. त्याला बाहेर काढल्यानंतर काही क्षणातच अमोल कापसे नावाचा युवक या खड्डय़ात पडला. परंतु, पाण्यामुळे हे दोघे युवक जखमी झाले नाहीत. त्यांना बाहेर काढून मी खड्डय़ाजवळ बॅरिकेड्स लावले. मोहनदास सांगळे, बीटमार्शल, अंबड पोलिस ठाणे

सिडकोने टाकलेली जलवाहिनी
सिडको प्रशासनाने 1981-82 च्या सुमारास टाकलेली ही उच्च् दाबाची जलवाहिनी आहे. वेल्डिंग निघाल्याने ती फुटली. याची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने वाहिनीची दुरुस्ती केली. आर. के. पवार, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

सर्व जुन्या जलवाहिन्या बदला
‘‘जलवाहिनी फुटल्याने रस्त्यात हा खड्डा पडला असला तरीही सुदैवाने जीवितहानी टळली. आता या वाहिनीची डागडुजी करण्यात आली असली तरीही ती जुनी झाल्याने भविष्यातही अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने प्रथमत: ही जलवाहिनीच बदलावी. तसेच, शहरातील सर्वच जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घ्यावे’’ सुजाता डेरे, नगरसेविका

रस्ता होणार गुरुवारपर्यंत पूर्ववत

जलवाहिनीची दुरुस्ती रविवारी दुपारच्या सुमारास झाल्यानंतर खड्डा बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत या रस्त्यात खडीकरण करून तो तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीस खुला करून देण्यात येईल. तसेच, गुरुवारपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून तो पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली. रविवारी सकाळी 9 वाजता या ठिकाणी खड्डा बुजविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले. जेसीबी यंत्रणेसह या ठिकाणी काम सुरू करण्यात आले. हे काम दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण झाले.