आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावरही हवे नियोजन; अलाहाबाद घटनेने दिला सावधगिरीचा इशारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- अलाहाबाद कुंभमेळ्यात स्नान करून परतणार्‍या तीसपेक्षा अधिक भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. त्यामुळे नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या नाशिकरोड स्थानकावर नियोजनाचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नाशिकमधील 2002-03 च्या व त्यानंतर रविवार(दि. 10) च्या अलाहाबाद कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्याने दहशतवादी कारवायांबरोबरच अशा आपत्ती रोखण्याचे कर्तव्य प्रशासनाला बजवावे लागणार आहे. ही घटना मध्य रेल्वेला सावध करणारी अशी आहे. अलाहाबाद स्थानकावर नाशिकपेक्षा चारपट अधिक प्लॅटफॉर्म असताना चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. मध्य रेल्वेच्या नाशिकरोड स्थानकावर तीनपैकी केवळ दोनच नियमित वापराचे प्लॅटफॉर्म आहेत. नाशिकमध्ये सन 2014-15 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याला अलाहाबादपेक्षा निम्मे म्हणजे दोन ते अडीच कोटी भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे. कुंभमेळ्यासाठी नियमित गाड्यांव्यतिरिक्त देशभरातून मोठय़ा संख्येने विशेष गाड्या सोडण्यात येत असल्याने नाशिकरोडला गर्दी होऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आतापासूनच नियोजनाची गरज आहे. राज्यातील पहिल्या पाच स्थानकांमध्ये नाशिकरोड स्थानकाचा समावेश आहे. येथून रोज 150 प्रवासी गाड्या ये-जा करतात.

अपुरे प्लॅटफॉर्म : नाशिकरोड स्थानकावरील तीन प्लॅटफॉर्म कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी पेलण्यास अपुरे आहेत. त्यात तीनपैकी दोन प्लॅटफॉर्मवरूनच प्रवासी वाहतूक होते. प्लॅटफॉर्मची क्षमता व लांबी : एक नंबर प्लॅटफॉर्मची लांबी 485 मीटर व प्रवासी क्षमता पाच हजार आहे. दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी 653 मीटर असून, प्रवासी क्षमता दहा हजार, तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी 622 मीटर असून, प्रवासी क्षमता दहा हजार आहे.

गाड्यांची क्षमता : स्थानकावरून धावणार्‍या गाड्या 22 ते 24 बोगींच्या आहेत. प्रत्येक गाडीत दोन ते अडीच हजार प्रवासी प्रवास करतात. एसी-2 बोगीत 46, एसी-3 बोगीत 56, स्लीपर-बोगीत 72, सर्वसाधारण बोगीची क्षमता 105 असली तरी त्यात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशांचा भरणा असतो.