आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातील सर्व रस्ते हवेत दीडशे फुटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अरुंद रस्ते हीच समस्या, वाहनांची वाढलेली संख्या ही डोकेदुखी, रस्त्यावरील अतिक्रमणांचा जाच, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची कमतरता, अशा अनेक समस्यांचा ऊहापोह करत त्यावर आपापल्या परीने साधता येणार्‍या उपाययोजना मांडत नागरिकांनी त्यांची मते रविवारी याबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मोकळेपणाने मांडली. शहरातील सर्व रस्ते दीडशे फुटी करावेत, अशी सूचनाही यात मांडण्यात आली.

इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी या सामाजिक संस्थेच्या वतीने इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग संस्थेच्या सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी शहरातील वाहतुकीचे नियोजन करणे, कुठे काय असावे, काय असू नये, याबाबतचा निर्णय हा प्लॅनिंग अथॉरिटीने घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. बसस्टॅण्ड कुठे असावेत, एकाच ठिकाणी रिक्षांनी घोळका करण्यापेक्षा थोड्या-थोड्या अंतरावर रिक्षा स्टॅण्ड कसे असावेत, याबाबत नियोजन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातील सर्व रस्ते हे 150 फुटी असणे अत्यावश्यक असल्याचेही बग्गा यांनी सांगितले. काही समस्यांवर त्वरित, तर काहींवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचे पालिकेचे अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. पालिकेने आठ वर्षांपूर्वी सिटी ट्रॅफिक सव्र्हे केला असून, तेव्हापेक्षा वाहतुकीचे प्रमाण सध्या तिप्पट आहे. त्यामुळे आता नव्याने अशाप्रकारचे सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाहतूक विभागाचे प्रमुख गप्प

शहरातील वाहतूक नियोजनाबाबत चर्चा सुरू असताना शहर वाहतूक विभागाचे प्रमुख संजीव ठाकूर यांनी या उपक्रमात पूर्ण वेळ सहभागी होणे आवश्यक होते. परंतु, ठाकूरसाहेब कार्यक्रमाच्या अखेरीस आले, पंधरा मिनिटे बसले आणि त्यांनी चर्चेत सहभागी होण्यासही नकार दिला. त्यामुळे या चर्चेत वाहतूक नियोजनाचा प्रमुख गप्पच राहिल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

असे सुचविलेले अन्य उपाय
रस्त्यांचे रुंदीकरण करावे, वाहन संख्येवर निर्बंध आणा, सायकल चालविण्यास प्रोत्साहन द्या, शहर बसेसची संख्या वाढवा, बस शहराच्या प्रत्येक कोपर्‍यापर्यंत पोहोचवा, पुढील 50 वर्षांची गरज भागावी असे नियोजन करा, शहराच्या आतील भागात छोट्या बसेसचे स्वतंत्र जाळे तयार करा, बससेवा वेळापत्रकानुसार चालवा.