आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांचा आब राखतील ‘दिव्य मराठी’चे किताब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिककरांनो, तब्बल दीड महिना तोंडही न दाखवणा-या पावसाने तुमच्या-आमच्या तोंडचे पाणीच पळवले. काल-परवा तो बरसायला सुरुवात होते न होते तोच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपली गत जणू ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली. चारचाकी-दुचाकी खड्ड्यांतून मार्ग शोधता-शोधता अडखळू लागल्या. चाकरमाने, व्यावसायिक, विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी पोहोचणे मुश्कील होऊन गेले. तशी ही समस्या दरवर्षीचीच. कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते तयार केले जातात; परंतु पावसाच्या चार सरी कामाच्या दर्जाची लक्तरे वेशीवर टांगतात. यात नवीन काही न राहिल्याने ‘नेमेचि येतो...’म्हणत तुम्ही-आम्ही निमूटपणे सारे सोसत आपापल्या कामास लागतो, फार तर महापालिकेच्या नावाने बोटे मोडतो; पण परिस्थिती काही बदलत नाही, तशी काही शक्यताही आपल्याला वाटत नाही. मात्र, त्यामुळेच हे बदलण्याची जबाबदारी असलेल्या मंडळींचे फावते. त्यांच्या या ‘कामगिरी’ची ‘दखल’ घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ काही खास किताबांची घोषणा करीत आहे. अर्थात, त्यासाठी तुमच्या सक्रिय योगदानाची गरज आहे. तेही सोपं आहे. तुम्ही एवढंच करायचं, तुमच्या प्रभागातील सर्वाधिक त्रासदायक खड्ड्यांचे फोटो आम्हाला पाठवायचे. त्यावरूनच ठरतील शहरातील खड्डारत्न, खड्डाश्री, खड्डाभूषण अशा स्वरूपाचे किताब...

पाठवा आपल्या प्रभागातील फोटो
किताबांची निवड विभागवार करण्यात येणार असून, नागरिकांचा फोटोरूपी प्रतिसाद मिळताच ‘दिव्य मराठी’तर्फे तज्ज्ञांचे एक पॅनल संबंधित भागाची पाहणी करून किताबप्राप्त प्रभागांची निवड करेल. दिवसागणिक प्रगतीकडे झेपावणा-या या शहरातील रस्त्यांचा दुर्लौकिक संपून ते दळणवळणासाठी कायमस्वरूपी योग्य व्हावेत, हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे. आपल्या प्रभागातील खड्ड्यांचे फोटो, संबंधित परिसर आणि पाठवणा-याच्या नावासह 9970146157 व 9767648860 यावर पाठवू शकता.