आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक आरटीओची कारवाई सुरूच; बेकायदा वाहतूक करणार्‍या 52 वाहनांवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोत स्कूलबसच्या धडकेने विद्यार्थी ठार झाल्याच्या घटनेनंतर जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशीही विनापरवानगी विद्यार्थी वाहतूक करणार्‍या 52 वाहनांवर कारवाई केली. भोसलाच्या शिशुविहारच्या बसमध्ये स्पीड गव्हर्नरच्या मीटरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी चालकासह मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली.

आरटीओने तीन स्वतंत्र पथकांद्वारे विद्यार्थी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली. पहिल्या दिवशी 80 वाहनधारकांना नोटीस देत खटले दाखल केले असून, 33 बस जप्त केल्या. यापाठोपाठ गुरुवारी सकाळी 7 वाजेपासूनच गंगापूररोड, कॉलेजरोड, आंनदवल्ली, अंबडलिंकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी भागात तपासणी केली. त्यात 30 पेक्षा अधिक स्कूल बसकडे परवानाच नसल्याचे आढळून आले. काही बसला स्पीड गव्हर्नर नसल्याचेही उघड झाले. जीप, व्हॅन आणि रिक्षांकडे परवाना नसतानाही 15 ते 20 विद्यार्थ्यांची वाहतूक करताना दिसून आले. वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सिल्व्हर ओक, निर्मला कॉन्व्हेंन्ट, फ्रावशी अँकॅडमी व मविप्र संस्थेच्या शाळांसह 52 वाहनचालक, मालक आणि शाळा व्यवस्थापनास नोटीस बजावण्यात आली. परिवहन अधिकारी सुमंत पाटील, शाहीद जमादार, विवेक देवखिले यांच्या पथकाने कारवाई केली.

वाहतूक शाखेकडूनही कारवाई : शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी दिवसभरात नाशिक शहरात केलेल्या कारवाईत 25 रिक्षा जप्त केल्या. तर, नाशिकरोड, भगूर व देवळाली कॅम्प येथे क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली. भगूर व देवळाली कॅम्प येथे 52 वाहनांवर कारवाई करून साडेपाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला. नाशिकरोडला 10 वाहनांवर कारवाई करण्यात आली.

स्कूलबसचा वेग ताशी 70 किलोमीटर
परिवहन विभागाने शाळा बसचालकांना ताशी 40 किमी वेगाची सक्ती केली आहे. मात्र, परिवहन विभागाच्या भरारी पथकास अंबडलिंक रस्त्यावर भोसलाच्या शिशुविहारची बस ताशी सुमारे 70 कि.मी. वेगात असल्याचे आढळले. बसच्या स्पीड गव्हर्नरमध्ये फेरफार केल्याचे आढळले. आरटीओच्या तपासणीनंतरच विद्यार्थी वाहतुकीसाठी बस रस्त्यावर आणावी, अन्यथा कायमस्वरूपी परवाना निलंबित करण्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला.