आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik RTO Action On Vehicle In Nashik, Fine Recover

वसुली जोरात; कारवाई मंद, वाहतूक पोलिसांनी केला 80 लाखांचा दंड वसूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात बेशिस्त वाहतूक करणार्‍या रिक्षा, दुचाकी आणि कारचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईत पोलिसांनी सातव्या महिन्यातच सुमारे 80 लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला असला तरी प्रत्यक्ष वाहतुकीस शिस्त लावण्यात यंत्रणा अपयशीच ठरल्याचे जागोजागी दिसून येते. त्यातच गत वर्षाच्या तुलनेत संख्यात्मक कारवाईतही यंदा घट झाली आहे. सीबीएस चौकापासून शालिमार, मेहेर चौक, अशोकस्तंभ भागात रस्त्यातच उभ्या राहणार्‍या रिक्षा, बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघाताचे प्रमाण वाढतच असल्याने पोलिसांची कारवाई केवळ दंड ‘वसुली’साठीच की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यामुळे वर्षभरातच गुन्ह्यांत तब्बल दीड हजाराने घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. पोलिस आयुक्तांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठीही लक्ष केंद्रित केले जाईल, असे आश्वासन देत अनेक महत्त्वाचे बदल केले. मात्र, त्याची यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने खुद्द पोलिस उपायुक्तांनाच रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करायची वेळ येऊ लागली आहे. वाहतूक शाखेच्या कारवाईचा आढावा घेतला असता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दुचाकी, रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात यश आले आहे.

या ठिकाणी बेशिस्त वाहतूक
सीबीएस चौक ते शालिमार मार्गावर आणि बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर पोलिसांच्या डोळ्यांदेखत रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचे दर्शन घडते. जिल्हा न्यायालयासमोर महात्मा गांधी रस्ता, वकीलवाडी, अशोकस्तंभ, शालिमार चौक, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, निमाणी बसस्थानकासमोरील चौक, मुंबई नाक्यावर, महामार्ग बसस्थानकाच्या दोन्ही बाजूस आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी निर्माण होत असते.

दंडात्मक कारवाईवर भर
गेल्या वर्षी सातव्या महिन्यातच 82 हजार वाहनांविरुद्ध कारवाई करीत सुमारे एक कोटी दोन लाखांचा महसूल प्राप्त केला होता. त्या तुलनेत यंदा केवळ 71 हजार वाहनांविरुद्ध कारवाई करीत 77 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच महिन्यापर्यंत तब्बल 12 हजार वाहनांवर अधिक दंडात्मक कारवाई करीत एक कोटीचा टप्पा गाठला होता.