आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याधुनिकीकरण: आरटीओमध्ये बुधवारपासून ‘वाहन’ प्रणालीने कामकाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) खासगी वाहनांसोबतच आता ‘वाहन’ या नव्या संगणक प्रणालीवर व्यावसायिक वाहनांच्या नोंदणी, परवाने नूतनीकरण अशी सर्वच कामे केली जाणार आहेत. ही अद्ययावत कार्यप्रणाली कार्यान्वित करणारे नाशिक हे राज्यातील तिसरे कार्यालय ठरणार आहे. बुधवारपासून (दि. 11)या प्रणालीने परिवहन कार्यालयात कामकाज सुरू होईल. अद्ययावतीकरणासाठी शुक्रवारपासून किमान पाच ते सहा दिवस व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीसह इतर कामे बंद ठेवण्यात येणार आहेत.
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजात गतिमानता आणण्यासाठी 1996 मध्ये संगणकीकरण करण्यात आले. ‘टूल्स’ या प्रणालीवर वाहनांची नोंदणी करण्यात येत होती. ही प्रणाली कालबाह्य झाल्याने 2007 मध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सूचना केंद्राने ‘वाहन’ सॉफ्टवेअर विकसित केले. त्याद्वारे खासगी वाहनांची (दुचाकी, कार, मोटारी) नोंदणी होऊ लागली. या प्रणालीमार्फत सहा वर्षांपासून वाहनांची नोंदणी, वाहन हस्तांतरण, परवाना नूतनीकरण, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची कामे करण्यात येत आहेत. मात्र, इतर व्यावसायिक वाहनांमधील ट्रक, बसेस, रिक्षा, जीप, मालवाहू वाहने, ट्रॅव्हल्स या प्रकारच्या वाहनांची ‘टूल्स’ प्रणालीवरच नोंदणी सुरू होती. त्यात अडचणी येऊ लागल्याने आता ‘वाहन’ प्रणालीवरच नोंदणी होणार आहे. यामुळे परिवहन विभागातील दोन सर्व्हर व दोन वेगवेगळ्या यंत्रणांऐवजी आता एकाच सर्व्हर व वाहन प्रणालीत नोंदणी होणार आहे. जुन्या वाहनांच्या नोंदणीचा डाटा नव्या प्रणालीत टाकण्यासाठी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याने 6 ते 10 डिसेंबर या कालावधीत कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.
कामकाज गतिमान होणार
‘वाहन’ ही संगणक प्रणाली विकसित झाल्यापासून दोन महिन्यांत ही प्रणाली कार्यान्वित करणारे ठाणे व पुणे परिवहन कार्यालयानंतर आता नाशिक कार्यालय तिसर्‍या क्रमांकाचे शहर ठरणार आहे. ही कार्यप्रणाली कार्यान्वित झाल्यास व्यावसायिक वाहनधारकांना व इतर वाहनचालकांची कामे वेळेत होणार आहेत. वाहनचालकांना तासन्तास थांबावे लागणार नाही.
कार्यालय होईल ग्राहकाभिमुख
नव्या ‘वाहन’ प्रणालीमुळे वाहनचालक, मालकांच्या वेळेची बचत होऊन वाहनांचा संपूर्ण डाटा सुरक्षित राहणार आहे. कार्यालय ग्राहकाभिमुख होणार आहे. अधिकारी-कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी पुणे कार्यालयात पाठविण्यात आले आहे. पाच दिवसांनंतर पूर्णपणे नवीन प्रणालीत कामकाज सुरू होईल.
-जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी