आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओतील कामकाज ठप्प; ‘लेखणी बंद’ने गैरसोय, लाखोंचा फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी- प्रादेशिक परिवहन विभागाच्या अमरावती कार्यालयातील तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ नाशिक कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी संघटनेने शुक्रवारी लेखणी बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनामुळे सकाळी कार्यालयात आलेल्या शेकडो वाहनधारकांची गैरसोय होऊन त्यांनी अचानक झालेल्या आंदोलनाचा निषेध नोंदविला. विभागाला लाखोंच्या महसुलावर पाणीही सोडावे लागले.

अमरावती परिवहन विभागाचे अधिकारी विजय लाडे, बजरंग खरमाटे, बाळासाहेब खडांगळे यांना गेल्या महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघाताप्रकरणी शासनाने चौकशी करून निलंबित केले आहे. या चौकशीत परिवहन अधिकार्‍यांनी विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी केली असती तर कदाचित अपघात टळला असता, असा ठपका ठेवण्यात आला आहे. शासनाच्या या निलंबनाच्या आदेशाविरोधात अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलन करून निषेध नोंदवला.

अचानक झालेल्या आंदोलनामुळे कार्यालयात शुकशुकाट होता. वाहन चालवण्याचा कायम आणि शिकाऊ अनुज्ञप्तीचा परवाना काढण्यासाठी आलेल्या शेकडो नागरिकांना आंदोलनाचा फटका बसला. परवाना नूतनीकरण आणि विविध प्रलंबित खटल्यांच्या तारखेसाठी आलेल्या वाहनधारकांना कुठलीही पूर्वसूचना नसल्याने तसेच परतावे लागले. त्यामुळे या वाहनधारकांनी संताप व्यक्त करीत अधिकारी-कर्मचार्‍यांनी केलेले आंदोलन योग्य असले तरी त्यांनी ग्राहकांची कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली.

विनाकारण भुर्दंड
दंड भरण्यासाठी अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार आलो होते. मात्र, काम बंद असल्याने चक्कर वाया गेला. यामुळे भिवंडीहून नाशिक येथे येण्यासाठी प्रवासखर्च व मुक्कामाचा भुर्दंड सोसावा लागेल.
-सलील अहमद, भिवंडी

वेळ, पैशांचा अपव्यय
दुचाकीचा शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी महाविद्यालयातून सुटी घेऊन कार्यालयात आले. यासाठी रिक्षा भाडे खर्च करून तास-दीड तास कर्मचार्‍यांची प्रतीक्षा केली.
-अश्विनी बोरसे, विद्यार्थिनी

निषेधासाठी आंदोलन
चौकशी न करता निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. मात्र, अचानक केलेल्या आंदोलनामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्तकरतो.
-चंद्रकांत खरटमल, आरटीओ