आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदानपूर्तीसाठी दौड २० हजारांची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - समाजातील वंचित गरजू घटकांना मदतीसाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिक रनमध्ये सुमारे २० हजारांहून अधिक नाशिककरांनी सहभागी होत सामाजिक बांधिलकीच्या योगदानपूर्तीला हातभार लावला. थंडीच्या वातावरणात लहान मुलांसह, महाविद्यालयीन तरुण, महिला आणि ज्येष्ठांच्या सहभागाने नाशिक रनमध्ये उत्साह अन् चैतन्य दिसले. सकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन राष्ट्रगीतानंतर नाशिकचे "रॅम' विजेते सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून रनला प्रारंभ झाला.
गरजू घटकांना आर्थिक मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. ट्रस्टतर्फे गेल्या १३ वर्षांपासून ‘नाशिक रन’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. नाशिक रनचे यंदाचे १४वे वर्ष होते. महात्मानगर येथील मैदानावर सकाळी हजारो नाशिककर जमले होते. प्रारंभी महापौर अशोक मुर्तडक, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, विजय पाटील, ‘महिंद्रा’चे उपाध्यक्ष हिरामण आहेर, बॉश कंपनीचे उपाध्यक्ष एच. पी. थोंटस, बॉशचे सहव्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, इप्कॉस टीडीके कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एन. बालकृष्णन, रन ट्रस्टचे विश्वस्त राजाराम कासार, सुधीर येवलेकर, अनिल पैठणकर, उत्तरा खेर, सलील राजे, मोहन पाटील, अद्वैत खेर आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीताच्यातालावरील वार्मअपने वेधले लक्ष : ‘नाशिकरन’च्या प्रारंभी महात्मानगरच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात क्रीडाज्योत प्रज्वलित झाली. त्यानंतर मराठी हिंदी गीतांच्या तालावर नाशिककरांनी केलेल्या वार्मअपने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोरया मोरया, देस रंगीला रंगीला या गीतावर वार्मअपवर देशभक्तीचाही जागर केला. यात महापाैर अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक मान्यवरांनी डान्स करत वार्मअप केला.

उपक्रमादरम्यान २० हजार टी शर्टची विक्री
उपेक्षितांना मदत म्हणून उद्योजकांसह अनेक कंपन्यांना सहभागी करून घेतले जाते. यात सहभागी नागरिकांना टी शर्टचे वितरण केले जाते. टी शर्ट विक्रीतून संकलित होणारा निधी हा सामाजिक कार्यासाठी वापरला जातो. या वर्षीच्या उपक्रमात २० हजार नाशिककरांनी टी शर्ट खरेदी केल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात निधी जमा होण्यास मदत झाली. शेवटी विविध संस्थांनी प्रायोजित केलेल्या लकी ड्रॉचे वाटप करण्यात आले.

अशी निघाली तीन टप्प्यांतील दौड
शहरातील विविध शाळा, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, आैद्योगिक कंपन्यांमधील कामगारांसह ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन उपेक्षितांप्रति सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित केली. तीन टप्प्यांत नाशिक रन पार पडली. त्यात पहिल्या टप्प्यात विशेेष अाणि अपंग बालके, दुसऱ्या टप्प्यात लहान मुले मुली अाणि तिसऱ्या टप्प्यात प्राैढांना साेडून नाशिक रनचा उपक्रम साजरा झाला.