आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांची दक्षता समिती वेटिंगवर; पोलिसांकडून दुर्लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सराफांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्थापलेल्या दक्षता समितीला पोलिसांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. राज्यात सराफी पेढय़ांवर लुटीच्या घटना ध्यानात घेत दक्षता समिती स्थापण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. शासनाने मार्च 2012 मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार शहरातील सराफांनी समितीच्या सदस्यांची यादी दिली. त्यास आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप एकही बैठक बोलविण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही.

नागपूर आयुक्तालयांतर्गत स्थापलेल्या दक्षता समित्या याकरिता मॉडेल म्हणून स्वीकारण्यात आल्या. गृहविभागाच्या 10 ऑगस्ट 2011 च्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 7 नुसार पोलिसांनी जिल्हा स्तरावरील दक्षता समितीच्या घटकप्रमुखांनी दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन व या बैठकीचा अहवाल गृह विभागाच्या उपसचिवांकडे सादर करावा. या तिमाही अहवालांचे अवलोकन करून पोलिस महासंचालक कार्यालयात वर्षातून एकदा बैठक होईल अशा या तरतुदी कागदावरच आहेत. राज्य समिती मार्च 2011 मध्ये स्थापली असली तरी तीची बैठक अद्याप झालेली नाही.

प्रतीक्षा कायम
नाशिक शहरातील सराफ असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची यादी देऊन आठ महिने झाले. मात्र, पोलिसांकडून अद्याप समिती स्थापन करण्यात आलेली नाही. सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आमच्या व्यावसायिकांना आहे. राजेंद्र ओढेकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

बैठक त्वरित व्हावी
राज्यस्तरीय समिती स्थापन होऊन दहा महिने झाले तरी तिची बैठक नाही. बैठक त्वरित व्हावी. मंगेश टाकळकर, राज्यस्तरीय दक्षता समिती, सदस्य.

समिती स्थापण्यात अडचण नाही
दक्षता समिती स्थापन केलेली नाही हे मान्य. सराफ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी यावे चर्चा करावी, समिती स्थापन करण्यास कुठलीही अडचण नाही. संदीप दिवाण, पोलिस उपायुक्त (गुन्हे)