आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारडा सर्कल रस्त्यावर विद्यार्थ्यांची रोज परीक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - जुने नाशिक येथील सर्वाधिक आणि क्लिष्ट वाहतुकीचा परिसर म्हणजे सारडा सर्कल परिसर. या रस्त्यावर असलेल्या नॅशनल उर्दू हायस्कूल व महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास हे एक दिव्यच आहे.

अधिकृत नसले तरी ‘गॅरेज हब’ म्हणून हा भाग परिचित आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी नित्याचीच. शिवाय शहरात प्रवेश करण्याचा मार्ग असल्याने या ठिकाणी कायम वर्दळ असते.

शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना येथून जीव मुठीत धरून मार्गाक्रमण करावे लागते. यापूर्वी रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत.

शाळा-महाविद्यालयासाठी उड्डाणपूल बांधावा, निवारा शेड, पादचारी पुलाची निर्मिती करावी किंवा भुयारी मार्ग तयार करावा, अशी अनेक दिवसांची परिसरातील नागरिकांची तसेच कार्यकर्त्यांची मागणी आहे. माजी नगरसेवक सय्यद मुशीर मुनीरोद्दीन यांनी स्कायवॉकचे उद्घाटन केले. पण तेही प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. तसेच स्कायवॉकला एका राजकीय नेत्याचा विरोध आहे, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे.

शहरातील विविध भागांतून इथे बसने प्रवास करून महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, सारडा सर्कल परिसरात कायस्वरूपी बसथांबाही नसल्याने मोठा फेरा मारून विद्यार्थ्यांना बससाठी द्वारकापर्यंत जाऊन बस पकडावी लागते.

आमदार वसंत गिते यांच्या निधीतून येथे निवारा शेड उभारण्यात आला. मात्र त्याबाबतही राजकारण होत असून तो शेड अनेक दिवसांपासून कॉलेज कॅम्पसमध्ये धूळखात पडून आहे. या भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु ते क्वचितच येथे आढळतात. परिसरात गतिरोधकही नसल्याने वाहनांच्या वेगावरही नियंत्रण राहत नाही. अशा अनेक समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार निवेदनही दिले मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.

विद्यार्थ्यांची गैरसोय
सारडा सर्कलवर शहर बसथांबा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वेगवान वाहनांना सामोरे जावे लागते. या ठिकाणच्या या गंभीर धोक्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ. डी. एम. भगत, प्राचार्य, नॅशनल कॉलेज

स्कायवॉकला परवानगी
स्कायवॉकचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आता त्याचा निकालही लागला आहे. स्कायवॉकसाठी न्यायलयाने परवानगी दिली आहे. परंतु त्याच्यात काही राजकारणी हे काम पुढे ढकलण्याचे काम करीत आहेत. मुशीर सय्यद, माजी नगरसेवक

निवारा शेडबाबत राजकारण
आमदार वसंत गिते यांच्या निधीतून या भागात नॅशनल महाविद्यालयासाठी निवारा शेड देण्यात आला आहे. मात्र, त्याच्यावरही राजकारण होत आहे. आमदारांनी दिलेला हा शेड गेल्या कित्येक दिवसांपासून कॉलेज कॅम्पसमध्ये धूळखात पडून आहे. गुलजार कोकणी, नगरसेवक