आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे खळखळाट, कुठे ठणठणाट; सातपूरमध्ये महिलांचा नगरसेवकांच्या घरावर मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - प्रभाग 17 मधील ध्रुवनगर येथील गुलमोहर कॉलनीतील महिलांना गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी संतप्त महिलांनी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर पाटील यांनी महिलांसमोरच पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना फोन लावून तात्काळ पाणीपुरवठा करण्यास सांगितले.

गुलमोहर कॉलनीतील रहिवाशांना गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरील बोअरिंगच्या पाण्यावर दिनचर्या भागवावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी परिसरातील 25 ते 30 महिलांनी नगरसेवक दिनकर पाटील यांचे कार्यालय गाठून त्यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले. नगरसेवक पाटील यांनी महिलांसमोरच पालिकेचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांना फोन करून गुलमोहर कॉलनी परिसरात पाणीपुरवठा करण्याचे सांगून दुपारपर्यंत पाण्याचा टॅँकर देण्यास सांगितले.

हंडाभर पाणी मिळत नाही

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणी येत नाही. जर आलेच तर एक हंडादेखील भरत नाही. पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. मीरा वर्पे

पाण्याचे कोणत्याही स्वरूपाचे नियोजन नाही. तीन दिवसांनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्यासाठी मोठी भटकंती होते. आम्ही नगरसेवकांकडे तक्रार करणार आहोत. पूनम खोडे

या परिसरात नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या बोअरवेलचे पाणी आम्हाला वापरावे लागत आहे; मात्र रोजच्या जाण्याने लोकही ओरडू लागले आहे. आरती सोनवणे

इंदिरानगरलाही होतोय अनियमित पाणीपुरवठा

पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका इंदिरानगरवासीयांना बसत असून, बुधवार व गुरुवारी बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा झालाच नाही. वडाळागाव, डीजीपीनगर या भागांमध्ये बुधवारी व गुरुवारी पाणीपुरवठा असुरळीत झाल्याने महिलांना वणवण करावी लागली. पाणीपुरवठा न झाल्याने महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रभाग क्रमांक 38 च्या नगरसेविका नीलिमा आमले यांनी स्व-खर्चाने टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामुळे महिलांची गैरसोय टळली. पालिकेने त्वरित सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.