आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बसचालकाचा परवाना निलंबित; ‘अभिनव’च्या मुख्याध्यापिकेस नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोतील उपेंद्रनगर भागात बालवाडीतील विद्यार्थी सारंग जाधव हा बसच्या धडकेत ठार झाल्याच्या घटनेनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने याची तातडीने दखल घेत संबंधित स्कूलबसच्या चालकाचा वाहन परवाना निलंबित केला. तसेच उत्तमनगरच्या मविप्र संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली.

अपघाताच्या या घटनेची प्रादेशिक परिवहन विभागाने घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संशयित चालक सोमनाथ वडजे (रा. सुकेणे) यास नियमानुसार वाहन चालविण्याचा केवळ दोन वर्षांचा अनुभव असल्याचे आढळले. तो किमान पाच वर्षांचा असणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

स्कूलबसमध्ये आवश्यक उपाययोजना केलेल्या नव्हत्या. या प्रकरणी बसचालकाचा वाहन चालविण्याचा परवाना तात्पुरता निलंबित करून त्यास दोन दिवसात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान, परिवहन विभागाने अभिनव शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या नावे नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात शालेय परिवहन समितीच्या अध्यक्ष नात्याने विद्यार्थी सुरक्षिततेची जबाबदारी मुख्याध्यापिकेवर असून, त्यांनी बसचालकाला पुरेसा अनुभव नसताना, त्यास नेमले व त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणीदेखील केली नसल्याचे आढळले आहे. यावर योग्य तो खुलासा करावा, असे या नोटिसीमध्ये बजावण्यात आले आहे. अन्यथा शिक्षण विभागाकडून याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यात परिवहन विभागाने दिला आहे.