आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता हेच भांडवल, ज्ञानाधारित समाजरचना करण्याची अावश्यकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वाची आहे. एकविसाव्या शतकात पैसा नव्हे, तर गुणवत्ताच खरे भांडवल आहे. त्यामुळे शिक्षणाला गुणवत्तेकडे नेण्याची गरज असून, शाश्वत विकासासाठी ज्ञानाधारित समाजरचना बनविण्याची आवश्यकता असल्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 
 
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकमहोत्सवी साेहळ्याचे उदघाटन रविवारी (दि. २८) फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते म्हणाले, की भविष्यात गुणवत्ताधिष्ठीत शिक्षणासाठी पद्धतीत बदल केले जात अाहेत. त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता अाहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे काम शासन, शिक्षणसंस्था, शिक्षक आणि पालकांचे अाहे. शिक्षणाबाबत पूर्वी राज्याचा देशात अठरावा क्रमांक होता. पण, प्रगत शिक्षण अभियानामुळे ४० हजार शाळा उन्नत करण्यात अाल्याने राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. या प्रयत्नांमुळे राज्य लवकरच देशात पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. इंटरनेट ऑफ थिंग्ज ही गरज असून येथून पुढे भव्यतेपेक्षा आवश्यकता, नीटनेटकेपणा महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगन ते म्हणाले, ‘राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ४४ हजार शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत, तंत्रज्ञानाचे दूत होण्याची स्वत:हून केलेली घोषणा कौतुकाची बाब आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालये, शाळा शैक्षणिक संस्थांनी करावे.’ 

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकीय वाटचालीत अभिमान वाटावा असे असंख्य नामवंत विद्यार्थी संस्थेने घडविले आहेत. संस्थेचा एक कोटी सूर्य नमस्कारांचा उपक्रम ‘प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन’चा उत्तम मार्ग असल्याचे सांगत त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मंडळाला एक कोटी रुपये दान देणाऱ्या गंगुबाई आणि सिंधुताई या धामणकर भगिनींच्या दातृत्त्वाचे मोठे उदाहरण इतरांनाही समाजकर्तव्य म्हणून परतफेड करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
जलसंपदा पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, की नाशिक शिक्षण हब म्हणून पुढे येत आहे; परंतु केवळ संख्या वाढवून उपयोग नाही. तर दर्जा उत्तम असावा. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणगीदार धामणकर भगिनींचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर यांनी शतक महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली. कार्याध्यक्ष महेश दाबक यांनी मंडळाचा इतिहास, वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, तसेच मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. विनायक गोविलकर, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, श्रीपाद देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, वैशाली गोसावी आदी उपस्थित होते. 

नाशिप्र मंडळाच्या शतकमहाेत्सवी साेहळा उद‌्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय काकतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. समवेत पालकमंत्री गिरीश महाजन, विनायक गाेविलकर अादी मान्यवर. 
 
बातम्या आणखी आहेत...