आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून नुकतेच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झालेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांची साथ देत थेट प्रतिशिवसेना स्थापन करण्याच्या हालचालींत सहभागी असलेले माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व माजी महापौर विनायक पांडे यांनी रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बागुलांविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली. एवढय़ावरच हे पदाधिकारी थांबले नाहीत तर बागुलांना पक्षाने खूप काही दिले, पक्ष सोडल्याने त्यांच्या नावातील फक्त ‘बा’ राहील बाकी ‘गुल’ होऊन जाईल, असा शालजोडीतला शाब्दिक टोला लगावण्यासही ते विसरले नाहीत.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला. या मेळाव्यात सर्वच पदाधिकार्यांनी एकमेकांतील गटतट विसरून भगवी क्रांती निर्माण करण्यासाठी कामाला लागावे, असे भावनिक आवाहन राऊत यांनी केले. संपूर्ण मेळाव्यात राऊत यांनी आपल्या भाषणातून बागुल यांचा नामोल्लेख घेणे टाळत पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरच भर दिला. परंतु, पक्षाच्या माजी पदाधिकार्यांनी बागुल यांनाच लक्ष्य केले. पांडे म्हणाले की, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर व ज्या बागुलांना राष्ट्रवादीत नेले, त्या दिलीप बनकरांची तरी राष्ट्रवादीत काय अवस्था झाली आहे, हे दिसत असतानाही बागुलांचे काय होणार? ते माहीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेनाप्रमुखांनी सामान्य कार्यकर्त्यांना नावारूपास आणले. बागुलांनाही अनेक सत्तेची पदे दिली. पण, त्यांचा भाऊ स्वत:च्याच प्रभागात पराभूत झाल्याचीही आठवण करून दिली. पांडे यांचीच री गायकवाड यांनीही ओढली. सामान्य कार्यकर्त्यांना शिवसेनेने वलय निर्माण करून दिले. त्याच पक्षाशी प्रतारणा या मंडळींनी केली. आपण शेवटपर्यंत बागुलांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु निष्ठेपुढे नातेगोते र्शेष्ठ ठरले. त्यांच्या जाण्याने काहीही नुकसान होणार नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही निष्ठावंत असल्याचा पाढा वाचत कधीही वाट चुकलो नाही. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, मात्र यापुढे प्रत्येक शिवसैनिक, पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्यात सर्वत्र भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा दावादेखील त्यांनी केला.
राज ठाकरेंवर टीका
मेळाव्यात राऊत यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना महापालिकेतील सत्ताधारी मनसेवरही तोंडसुख घेतले. काल-परवाच येऊन गेलेल्या नेत्याने ( राज ठाकरे यांचे नाव न घेता) अजून नऊ महिने झाले नाही, असा कांगावा करीत असल्याचे वक्तव्य केले. यावर राऊत म्हणाले, ‘अहो, बारा महिने होत आले, असे कोणते बाळंतपण व कोणते डॉक्टर आहेत की 12 महिन्यांनंतर पोर जन्माला येईल? नाशिककरांना साधे पिण्याचे पाणी वेळेवर देऊ शकले नाही, हे काय विकास साधणार’, असा सवालही त्यांनी केला.
बेरोजगारी, दुष्काळाचे आव्हान
शिवसेनेपुढे केवळ सत्ता अथवा विरोधकांचे आव्हान नसून वाढती बेरोजगारी, भीषण दुष्काळाचे सावट असून, ते दूर करण्याचे आव्हान आहे. आगामी निवडणुकीत शिवशाही आणण्यासाठी भगवी क्रांती, मिशन भगवा हेच असले पाहिजे, उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रखर विचारांचीच गरज असल्याचेही राऊत म्हणाले. मेळाव्यास ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, अल्ताफ खान, आमदार बबनराव घोलप, आमदार धनराज महाले, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, अजय बोरस्ते उपस्थित होते.
फेब्रुवारीत नवीन कार्यकारिणी : राऊत
शिवसेना निष्ठावंतांचा पक्ष असून, पक्षातून जे गेले त्यांची पर्वा नाही; पण जे आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून, ते शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करतील, असा विश्वास व्यक्त करीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली.
शालिमार चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे दुसर्या टप्प्यातील राज्याचा फेब्रुवारीपासून दौरा सुरू करणार आहेत. काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली कार्यकारिणीची घोषणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे. राहुल गांधी हा अपयशी नेता असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतिरेकी घडवत असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा राऊत यांनी समाचार घेतला.
‘राऊत लॉबी आहे का?’
शिवसेनेत राऊत लॉबी असल्याचा वारंवार आरोप होत असून, माजी जिल्हाप्रमुख बागुल यांनीही तसेच आरोप केले आहेत, याबाबत विचारणा केली असता राऊत म्हणाले की, योगायोगाने पाच-सात राऊत शिवसेनेत सक्रिय आहेत. पक्षात कार्यकर्ता म्हणून वाटचाल करताना शिवसेनाप्रमुखांनी विश्वासाने पदे दिल्याने घडत गेलो. पक्षात पदे असो नसो पण पक्षाची सेवा करीतच राहू, मात्र पक्षात अशी कुठलीही लॉबी कार्यरत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.