आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: युवा सेनेला मिळेना नेतृत्व; मात्र ज्येष्ठांचे जपणार ‘पितृत्व’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महानगरप्रमुखपदाला टप्पा देऊन शिवसेनेने उपमहानगरप्रमुख पदांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली खरी; मात्र युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती अद्यापही घोषित न केल्यामुळे शिवसेना अजूनही युवा नेतृत्वाच्या शोधातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे नेतृत्वाचा असा शोध सुरू असतानाच ज्येष्ठ शिवसैनिकांना मान-सन्मान देण्याचे शिवसेनेने ठरविले आहे.

युवा सेनेत 25 वर्षांच्या आतील युवकांनाच पदाधिकारी म्हणून संधी देण्याचे धोरण शिवसेनेने अवलंबल्याने कार्यकारिणी गठित होण्यास विलंब होत असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून मनसे स्थापल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी संघटनेच्या पातळीवर मोठे फेरबदल करण्याचे ठाणले होते. त्यानुसार नाशिकमधील कार्यकारिणी पालिका निवडणुकीनंतर बरखास्त केली. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उडी घेतली. वर्षभरापूर्वी त्यांनी नाशिक दौरेही केले. युवा सेनेचे संपर्कप्रमुख म्हणून मिलिंद कापडे यांची नेमणूक करण्यात आली; परंतु कापडे यांनीही नाशिककडे पाठ फिरविल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. युवा सेनेच्या घोषणेस दोन वर्षे उलटल्यानंतरही नाशिकची कार्यकारिणी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांच्या नजरा आदित्य यांच्या निर्णयाकडे खिळल्या आहेत.

ज्येष्ठ शिवसैनिकांना बोलावणार प्रत्येक कार्यक्रमात
सर्वसामान्य नागरिक व शिवसैनिकांपर्यंत पोचण्यासाठी शिवसेनेने तयार केलेल्या कोअर कमिटीबरोबरच आता शिवसेना ज्येष्ठ शिवसैनिकांना मानसन्मान देणार आहे. यासाठी सर्व ज्येष्ठांची यादी तयार करून शिवसेना त्यांना प्रत्येक कार्यक्रमासाठी निमंत्रित करणार आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पक्षीय पातळीवर लगीनघाई सुरू झाली आहे. शिवसेनेनेही संघटना बांधणीवर जोर देत शहर कार्यकारिणीपासून त्याची सुरुवात केली असून, त्यानंतर प्रत्येक विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यासाठी कोअर कमिटी स्थापण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी दोन पावले पुढे जात आता ज्येष्ठ शिवसैनिकांना मानसन्मान देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागातील ज्येष्ठांची यादी तयार करण्याचे आदेश शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी गटप्रमुख व विभागप्रमुखांना दिले आहेत. ज्येष्ठांना शिवसेनेच्या कार्यक्रमात निमंत्रित करण्याबरोबरच त्यांच्या सूचनांचाही आदर केला जाणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.