आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - शिवसेना या चार अक्षरांवर जीव ओवाळून टाकणार्या शिवसैनिकांचा काळ मागे पडत असतानाच रविवारी पुन्हा एकदा ‘जीव का जाईना.. शिवसेना’ असा गजर शिवसेना कार्यालयात घुमला. लोकसभेच्या सेमीफायनलसह विधानसभेची फायनल जिंकायचीच, या इराद्याने गटतट विसरून सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भगवा फडकवण्याचा इरादा या बैठकीत व्यक्त केला.
दोन वर्षांहून अधिक काळापासून रिक्त असलेल्या शिवसेना महानगरप्रमुखपदी अखेर अजय बोरस्ते यांची नियुक्ती झाली, तर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक हेमंत गोडसे यांना लोकसभा संघटकपदी नियुक्त करण्यात आले. महिला संघटकपदी अँड. श्यामला दीक्षित, सुहास कांदे यांची नांदगाव विधानसभा संघटक, उपमहानगरप्रमुख म्हणून प्रताप मेहरोलिया आणि उपजिल्हाप्रमुख म्हणून जगन आगळे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचा शिवसेना कार्यालयात नव्या-जुन्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
मरगळ झटकण्याचा प्रयास : प्रदीर्घ काळापासून महानगरप्रमुखाचे पद वादग्रस्त ठरत असल्यानेच प्रलंबित ठेवण्यात आले होते. मात्र, आता त्या पदावर अजय बोरस्ते यांची, तर महिला संघटकपदी अँड. श्यामला दीक्षित यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने संघटनेत चैतन्याचा माहोल दिसून आला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक हेमंत गोडसे व सुहास कांदे यांनाही स्थान देऊन त्यांना एकप्रकारे पुढे चाल देण्यात आल्याने पक्षातील सर्व स्तरावरील मरगळ झटकण्याचा प्रयत्न त्यातून दिसून येत आहे.
मिर्लेकरांना आणखी एक जिल्हा : शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी गेल्या काही महिन्यांत नाशिक जिल्ह्यात पक्षसंघटनेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी केलेली कामगिरी लक्षात घेता त्यांची नाशिक, जालना, परभणीपाठोपाठ जळगाव जिल्ह्याचे संर्पकप्रमुख म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
गटबाजी गाडण्याचा निर्धार
नाशिक महापालिकेतील दशकभरापासूनची सत्ता मनसेच्या ताब्यात गेल्याने पक्षावर नामुष्की ओढवली होती. मात्र, मनसेदेखील काहीच किमया करू न शकल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्यांनाही स्फुरण चढले असून, त्याचाच प्रत्यय या बैठकीतील पदाधिकार्यांच्या भाषणातून दिसून येत होता. मध्यंतरीच्या काळात पक्षात वाढलेल्या गटबाजीमुळे हातातील एकेक सत्तास्थान गमावल्याने आणखी विदारक स्थिती निर्माण होण्याच्या भीतीपोटी का असेना, सर्व पदाधिकारी गटबाजी गाडून भगव्याखाली एकत्र वाटचाल करण्याची भाषणे झोडत होते. सभागृहातून कोणाच्याही नावाने नव्हे, तर केवळ पक्षाच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या नावानेच घोषणा देण्याचा आदेशही गटबाजी रोखण्याच्या दिशेनेच टाकलेले पाऊल ठरले.
लोकसभा, विधानसभेसाठी कामाला लागा
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनच नाशिकच्या दौर्यावर आलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्त्यांना हिरवा कंदील दाखविला. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी पक्षाचे मुखपत्र ‘सामना’मधून नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकप्रकारे लोकसभा आणि विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आदेशच या नियुक्त्यांमधून देण्यात आले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.