आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळण्याची भीती, विकास कामांच्या उद्घाटनात आला प्रत्यय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या महापालिकेवरील भगवा उतरल्यानंतर संघटना बांधणीसाठी संपर्कप्रमुखाची सूत्रे रविंद्र मिर्लेकरांच्या हाती दिल्यानंतर काहीअंशी शमलेली गटबाजी उफाळून येण्याची भिती निर्माण झाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी महापालिका विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागातील उद्घाटनाला हजेरी लावल्यानंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांसह आमदारांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तसेच, खुद्द राऊत व जिल्हाप्रमुखांमध्येच शाब्दीक टोलेबाजी झाल्याने शिवसैनिकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागातील विकासकामांचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. दोन दिवसांपूर्वी मनसेने राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचा धडाका लावल्यानंतर शिवसेनेने अचानक राऊत यांना का पाचारण केले, असाही सवालही केला जातो आहे. मूळात यापूर्वीच शिवसेनेतील एका गटाने राऊत यांच्या नाशिकमधील हस्तक्षेपाविरोधात उघडपणे तक्रारी करत त्यांचा ‘संपर्क’ कमी करण्यात यश मिळवले होते. दुसरीकडे रविंद्र मिर्लेकर यांनी संघटना बांधणीसाठी चांगले प्रयत्न केल्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची फळी एकसंघ होताना दिसत होती. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या वॉर्डप्रमुखांच्या मेळाव्याला दणदणीत प्रतिसादही मिळाला होता. यामुळे मध्यंतरी बाजुला पडलेला एक गट पुन्हा सक्रीय झाल्याचे चित्र दिसत होते. म्हणूनच की काय, राऊत यांच्या उपस्थितीत घेतलेल्या कार्यक्रमाला एका गटाने उपस्थित राहणे टाळले. आमदार बबनराव घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्यासह काही नेते व नगरसेवक अनुपस्थित राहीले तर, काही नगरसेवकांनी केवळ नावापुरतीच हजेरी लावल्यामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे. तसेच खुद्द मिर्लेकर यांनीही राऊत यांच्या पत्रकार परिषदेला जाणे टाळल्यामुळे त्यांची अनुपस्थितीही सर्वकाही सांगून गेली.