आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Shivsena Loksabaha Election Preparation Meeting

शिवसेनेची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रवादीकडून पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळू लागल्यामुळे शिवसेनेनेही जोरदार मोर्चेबांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी शिवसेना भवनात पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन रणनीती ठरविली. त्यात बोगस व स्थलांतरित मतदारांची यादी तयार करून जिल्हाधिकार्‍यांना देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मिर्लेकरांच्या उपस्थितीतील बैठकीला शहरातील पदाधिकारी, नगरसेवक तसेच त्र्यंबकेश्वर, सिन्नर व इगतपुरी येथील तालुकाप्रमुख, तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गेल्यावेळी शिवसेनेला नाशिक लोकसभा मतदारसंघात तृतीय क्रमांकावर रहावे लागले. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पराभव झाल्याचे खापरही फोडले गेले. याच निवडणुकीत विरोधकांनी बोगस मतदानाचा फायदा उचलल्यावरूनही गोंधळ झाला होता. एकूणच परिस्थितीत गटबाजी व बोगस मतदानावर आळा कसा घालायचा यावर मिर्लेकरांनी मंत्र दिला. पक्ष मजबूत करण्यासाठी वॉर्डनिहाय प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. नवीन मतदार नोंदणीही करून पक्षाचा जनाधार वाढवा, स्थलांतरित व बोगस मतदारांची नावे शोधून त्यांची यादी तयार करावी, अशा सूचनाही मिर्लेकर यांनी केल्या.

बूथप्रमुखांचा होणार मेळावा : वॉर्डप्रमुखानंतर बूथप्रमुख हेच पक्षाला तळापर्यंत पोहोचविण्याचे प्रमुख माध्यम असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला. बुथप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मेळावा घेतील, असेही बैठकीत सांगण्यात आले.

पेल्यातील वादळ
गटप्रमुखांच्या बैठकीत मिर्लेकर मार्गदर्शन करीत असताना अंतर्गत वाद होऊन शाब्दिक चकमकही झडली. त्यावरून मिर्लेकर यांनी खडे बोल सुनावताच नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी ‘माझे काही चुकले असेल तर राजीनामा देतो’ असा पवित्रा घेतला. मात्र, त्यानंतर संबंधितांची समजूत घालण्यात आल्याने अखेर ते पेल्यातील वादळच ठरले.

छायाचित्र - उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्याबद्दल नवाब मलिक यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी शालिमार चौकात दहन करताना शिवसैनिक.