आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक सिंहस्थ नियोजन: 151 चौक्यांची होणार निर्मिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समित्या स्थापन होत असतानाच पोलिस यंत्रणेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. पर्वणीच्या दिवशी शहरात येणार्‍या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे 8 हजार पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्तासोबतच 151 पोलिस चौक्या व 11 तात्पुरते नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्यात येणार आहेत.

पोलिस यंत्रणेसाठी सुमारे 104 कोटींच्या प्रस्तावित अंदाजपत्रकात प्रशासनाने कपात सुचविल्याने आता केवळ 52 कोटींवरच समाधान मानावे लागणार असल्याने नियोजनात तारखेवरची कसरत करावी लागणार आहे.

यासंदर्भात, नुकताच पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी अधिकार्‍यांकडून नियोजनाचा आढावा घेतला. 2015-2016 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यात पहिली पर्वणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. या पर्वणीच्या दिवशी शाहीस्नान होणार असून देशभरातून किमान 75 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे. या कालावधीत देशभरातील विविध आखाड्यांचे साधूमहाराज, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेते, मंत्री व भाविकांची नियमित ये-जा राहणार आहेत.

या काळात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाकडून सुमारे पाच हजार पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांचा जादा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत आयुक्तालयाच्या हद्दीतील 11 पोलिस ठाण्याच्या एकूण अडीच हजार असे साडेसात ते आठ हजार कर्मचार्‍यांचा बंदोबस्त असणार आहे. या बंदोबस्तासाठी संपूर्ण वर्षभराच्या काळात 151 तात्पुरत्या पोलिस चौक्या आणि 11 पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठी 14 कायमस्वरूपीची बॅरेक उभारण्यात येणार आहेत. शाहीमार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गोदाघाट, शाही मार्ग व महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 57 वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. तसेच, नाशिक पोलिसांचे सहायक पोलिस आयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गादर्शनाखाली एक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पाच कर्मचार्‍यांचे असे स्वतंत्र पथक अलाहाबाद कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी रवाना झाले आहेत. या पथकाकडून बंदोबस्त, शाहीमार्ग, वाहतुकीचे नियोजनाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर आवश्यक त्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत.