आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्याच्या पेशवाईत महिलांचा शंखनाद; त्र्यंबकेश्वरला नागासाधूंची मिरवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक)- ‘बमबम भोले’च्या गजरात शनिवारी श्री पंचदशनाम निरंजनी आनंद आखाड्याचे धर्मध्वजारोहण झाले. त्यानंतर रविवारी सिंहस्थ कुंभमेळ्याचे खास आकर्षण असलेली पेशवाई भाविकांना अनुभवता आली. चांदीच्या पालखीत कार्तिकेय स्वामींची सोन्याची मूर्ती, त्यापुढे बँडच्या तालावर नृत्य करणारे घोडे अन् नागासाधूंच्या लक्षवेधी कसरतींनी रंगलेल्या या नगरप्रवेश सोहळ्यातून शाही मिरवणुकांची झलकच दिसून आली.

श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत मंडलेश्वर यांची सजविलेल्या रथातून शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी स्वामी सागरानंद सरस्वती आश्रमात इष्टदेवता भगवान कार्तिकेय स्वामी शस्त्रातील भाले यांची पूजा करण्यात आली. तेथूनच सकाळी १० वाजता पेशवाईला प्रारंभ झाला. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर पुण्यानंदगिरी, आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी, षड्दर्शन आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती आदींचे स्वागत होऊन मिरवणूक मार्गस्थ झाली. मेन रोडमार्गे शोभायात्रा कुशावर्तावर पोहोचली. याठिकाणी देवतांची शास्त्रोक्त पध्दतीने स्नानपूजा होऊन मिरवणूक तेलीगल्ली, पाटील गल्लीमार्गे रिंगरोडने श्री पंचायती निरंजनी आखाड्यात दाखल झाली.

नेत्रदीपक शोभायात्रा
शाही स्नानाच्या वेळची मिरवणूक कडेकोट बंदोबस्त, अलोट गर्दीमुळे भाविकांनी जवळून पाहता येत नाही. नागासाधूंचे दर्शनही महत प्रयासाने होते. मात्र, पेशवाई ही सकाळीच निघाल्याने तिचा पुरेपुरे आनंद भाविकांना घेता आला. बँड ढोलपथकाच्या तालावर युवक-युवतींनी पारंपरिक पोषाखात नृत्य सादर केले. नागासाधूंनी दांडपट्टा इतर साहसी कसरती करत भाविकांना अचंबित केले. छत्र, चामर अब्दागिरी घेतलेल्या मंडळांमुळे मिरवणुकीला शाही रूप आले होते.