आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामचा मुद्दा: महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत साधूंचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पालिका स्तरावर साधु, महंत, लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांची समिती स्थापून साधुग्रामसाठी आवश्यक क्षेत्र व निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच साधुग्राम परिसराची पाहणी करण्याचा निर्णय महापौरांनी बोलविलेल्या बैठकीत गुरुवारी झाला. दरम्यान, साधुग्रामच्या जागेविषयी ठोस निर्णय न झाल्यास पुढील परिणामांना प्रशासनच जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा साधु-महंतांनी यावेळी दिला.

महापौर अँड. यतिन वाघ यांनी सिंहस्थ तयारीच्यादृष्टीने साधु-महंतांची बैठक बोलावली होती. साधुग्रामसाठी आरक्षित 300 एकर जागेचे काय झाले असा प्रश्न महंतांनी उपस्थित केला. यावर महापौरांनी 54 एकर जागा ताब्यात असून, उर्वरित 274 एकर जागेविषयी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगताच महंत भक्तीचरणदास आणि महंत कृष्णचरणदास यांनी कागदपत्रांविषयी न सांगता ठोस निर्णय काय घेणार, असा सवाल केला. नियोजनाविषयी विलंब झाल्याने शासन दरबारी आम्ही लोकप्रतिनिधींच्या बरोबर येणार असल्याचे कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांनी आश्वासन दिले. शासनस्तरावरील समितीवर साधु-महंताचा समावेश नसून, जिल्हाधिकारीदेखील कुठलाही निर्णय घेण्यास तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साधुग्रामधील इमारत एका खासगी शिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर दिल्याची तक्रार डॉ. प्रमोद बैरागी यांनी केली. यावर महापौरांनी ही जागा राजाराम पानगव्हाणे यांच्या संस्थेला भाड्याने दिल्याचे सांगून ती खाली करून घेणार असल्याचे सांगितले. उज्जैनचे उदाहरण देत नाशिकमध्ये कुठलेच नियोजन सुरू नसल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले. बैठकीस महंत रामसनेहीदास, महंत रामकिशोरदास, महंत रामशोभादास, महंत विश्वंभरदास, महंत सीतारामदास, हेमंत तळाजिया, दिलीप शुक्ल, दत्तात्रय भानोसे, अमित गायधनी, चंद्रशेखर पंचाक्षरी, अंबादास महाराज, धनंजय बेळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.