आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन म्हणते, घ्या नवा; साधू-संतांना मात्र जुनाच हवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मागील कुंभमेळ्यातील दुर्घटनेचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पर्यायी नव्या शाहीमार्गाच्या वापरासाठी शासकीय यंत्रणा आग्रही राहणार असून, तशा स्वरूपाची तयारी यंत्रणेकडून सुरू आहे, तर दुसरीकडे सर्वच आखाड्यांच्या साधू-महंतांनी मात्र नव्या मार्गाला विरोध करीत जुन्याच शाहीमार्गाने शाही मिरवणूक काढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

मागील कुंभमेळ्यात भाविकांची कोंडी होऊ नये, यासाठी पारंपरिक शाहीमार्गाबरोबरच साडेतीन कोटी रुपये खर्च करून पर्यायी शाहीमार्ग उभारण्यात आला होता. तपोवनाच्या बाजूने गोदावरीचा डावा तट, अमरधाममार्गे टाळकुटेश्वर पूल, संत गाडगे महाराज पुलाखालून रामकुंड असा नवा मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र, त्याचा वापरच झाला नाही. आलेल्या भाविकांसह साधू-महंतांनी त्या मार्गावरून जाण्यास विरोध करत असर्मथता दर्शविली होती. यावरून मोठय़ा प्रमाणावर वादंगही झाला होता. साधूसंत-महंतांसह भाविकांनी पारंपरिक मार्गच अवलंबिला. दुर्दैवाने सरदार चौकात एकाच वेळी गर्दी होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात 32 भाविकांना प्राण गमवावे लागले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी येणार्‍या भाविकांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी नव्या शाहीमार्गाचा वापर करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासंदर्भात राज्याच्या सचिवांनी जिल्हा प्रशासनाला रमणी आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. प्रशासनाकडून नव्या मार्गासाठीचे नियोजन सुरू असताना साधू-महंतांनी मात्र धार्मिक परंपरा असलेल्या शाहीमार्गाचाच वापर करण्यावर ठाम मत व्यक्त केले आहे.

गर्दीचे व्यवस्थापन करण्याची गरज
मागील शाहीस्नानाच्या दिवशी जुना शाहीमार्गाकडे येणारे सर्वच रस्ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश होते. असे असताना यासंदर्भात नेमण्यात आलेल्या यंत्रणेत योग्य संवाद होऊ न शकल्याने शाहीमार्गाच्या उलट दिशेने मोठय़ा प्रमाणावर भाविक आले आणि त्याच दरम्यान दुर्घटना घडली. यामुळे येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी क्राउड मॅनेजमेंटबरोबरच लाइन ऑफ अँक्शनची माहिती जनतेपर्यंत पोचविण्याची गरज असल्याची माहिती एका वरिष्ठ शासकीय अधिकार्‍याने दिली.

पर्यायी मार्गासाठी विश्वासात घेणार
कुंभमेळ्यात पर्यायी शाही मार्गाचा वापर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्यानुसारच याबाबतचे नियोजन केले जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही, याचीही प्रशासन दक्षता घेऊनच नियोजन करेल. विलास पाटील, जिल्हाधिकारी

सर्व आखाडेप्रमुख प्रशासनाला भेटणार
साधूसंत-महंतांचा परंपरागत धार्मिक महत्त्व असलेला जुना शाहीमार्ग आम्ही कायम ठेवणार आहोत. त्यात कुठलाही बदल होणार नाही. त्यासंदर्भात मागील सिंहस्थात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि नियोजन प्रशासनाने करावे. यासंदर्भात निर्वाणी आखाडा, अखिल भारतीय पंच निर्वाणी आखाडा, दिगंबर आखाडा यासह विविध आखाड्यांचे महंत जिल्हा प्रशासनाची भेट घेणार आहे. महंत रामसनेहीदास महाराज, लक्ष्मीनारायण मंदिर, तपोवन