आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-सिन्नर चौपदरीकरणात एमआयडीसीचा खोडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक-सिन्नर रस्ता चौपदरीकरण कामात एमआयडीसीच्या सुस्त कामाने खोडा बसला आहे. एमआयडीसीच्या लालफितीच्या कारभाराचा अनुभव उद्योजक नेहमीच घेत आले असताना, आता लाखो नाशिककरांनाही तो अनुभव मिळतो आहे. माळेगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा करणार्‍या 12 किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्यांचे स्थलांतरण अडल्याने ही वेळ आली आहे.
नाशिक-पुणे चौपदरीकरणातील नाशिक-सिन्नर हा 22 किलोमीटरचा टप्पा नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या कडेने 12 किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या आहेत. एमआयडीसीने टाकलेल्या या जलवाहिन्या टाकण्यासाठी लाइन एण्डनुसारच परवानगी देण्यात आलेली होती. त्यामुळे त्या नियमातच होत्या. पण, चौपदरीकरणाच्या मधोमध आता या जलवाहिन्यांत येत असल्याने त्याचे स्थलांतर निकडीचे झाले आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने एमआयडीसीकडे पाठपुरावाही केला. त्यानंतर एमआयडीसीने हा प्रस्ताव पुणे कार्यालयाकडे पाठविला आहे. तीन महिने होऊनही प्रस्ताव या कार्यालयाकडे धूळ खात पडून असल्याने रस्त्याच्या कामास
विलंब होत आहे.

अशी आहे जलवाहिनी
12 किलोमीटरच्या या जलवाहिनीतून माळेगाव औद्योगिक वसाहतीकरिता 30 दशलक्ष मिलिलिटर पाणी वाहून नेले जाईल, या पद्धतीने रचना करण्यात आली आहे. यातूनच 15 टक्के पाणी सध्या सिन्नर नगरपरिषदेकरिता दिले जाते. जलवाहिन्यांच्या स्थलांतराकरिता 15 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. नवे काम करताना या जलवाहिन्या भूमिगत असणार आहेत.

खासदारांनीही व्यक्त केला संताप
तीन महिन्यांपूर्वी उद्योजक, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत खासदार समीर भुजबळ यांनी किती प्रयत्नाने या रस्त्याकरिता निधी मिळविला, याचे गांभीर्य एमआयडीसीच्या लक्षात येत नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. तरीही एमआयडीसीकडून अद्याप प्रस्ताव मंजूर झालेला नाही.

मुख्यालयाकडे पाठपुरावा
आम्ही प्रस्ताव मुख्यालयाकडे तीन महिन्यांपूर्वी पाठविलेला आहे. सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर निविदा निघतील. त्यानंतर प्रत्यक्ष स्तलांतरास सुरुवात होईल.
एस. आर. तुपे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी