आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक-सिन्नर रेल्वे मार्गासाठी संयुक्त मोजणी पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अडीच वर्षांपूर्वी अधिसूचना निघूनही विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या नाशिक-सिन्नर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाकरिता आवश्यक शेतजमिनींची संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एमआयडीसीच्या भागीदारीतून साकारणार्‍या या 32 किलोमीटर मार्गासाठी दहा गावांतील 172.614 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत असून त्यापोटी शेतकर्‍यांना सुमारे 150 कोटींचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे.

हा मार्ग नाशिक तालुक्यातील एकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी; निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी व सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी, नायगाव, देशवंडी, पाट पिंप्री, बारागाव पिंप्री आणि गुळवंच अशा दहा गावांतून जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या मार्गाच्या भूसंपादनासाठी जिरायती शेतीला प्रतिएकर साडेसतरा लाख, तर बागायती शेतीला 35 लाख रुपयांचा वाढीव मोबदला देण्याची घोषणा केली असून तो देशात सर्वाधिक मानला जातो.

हा रेल्वेमार्ग पूर्णपणे शासनाच्या मालकीचा राहणार असून, विशेष आर्थिक क्षेत्राची प्रवर्तक कंपनी इंडिया बुल्स कंपनी गुंतवणूक करीत आहे. राज्यात विजेची टंचाई असताना हजारो कोटींची गुंतवणूक होऊनही केवळ कोळशाची ने-आण करण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्पाच्या क्षमतेएवढे वीज उत्पादन सुरू होऊ शकलेले नाही. गेल्या अडीच वर्षात शेतकर्‍यांसोबत वाटाघाटी, तसेच भूसंपादनाचा दर ठरवण्यासाठी प्रत्येक गावात जिल्हा प्रशासन व एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या. हा मार्ग ‘महाजेन्को’च्या ओढा ते एकलहरे रेल्वे मार्गाला समांतर राहणार असून, सध्याच्या मार्गालगत नवीन रेल्वेमार्ग असेल. प्रकल्पाच्या बाजूने आठ फूट रुंदीचा रस्ता व लोहमार्ग दुहेरी असेल. प्रस्तावित गटाच्या मधोमध रेल्वेमार्ग जात असेल व शिल्लक जुजबी क्षेत्रही संपादित होणार असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही, असा विश्वास शासनाने दिला आहे.

भूसंपादनास एकलहरेवासीय राजी
एकलहरे विद्युत केंद्राच्या उभारणीत योगदान देणार्‍या शेतकर्‍यांना 44 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त दाखले मिळण्याची प्रतीक्षा होती. मात्र, पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषदेत पाठपुरावा करून प्रकल्पग्रस्तांच्या पणतवंडांना हे दाखले देण्याचा निर्णय घेण्यास शासनाला भाग पाडल्याने सिन्नर रेल्वेमार्गासाठी होणार्‍या भूसंपादनास एकलहरेवासीय राजी झाले आहेत.

असा असेल रेल्वेमार्ग
केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने हा रेल्वेमार्ग आखला असून तो कमीत कमी अंतरावरून नेण्यात आला आहे. या मार्गावर 39 ठिकाणी अंडरपास देण्यात आले असून ग्रामस्थांना त्यातून जाण्या-येण्यासह ओव्हरहेड लाइन्स, पाइप लाइन इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत.