आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा क्रीडासंकुलाचा मार्ग मोकळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा क्रीडासंकुलाबाबतचा वाद मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे संपुष्टात आला असून, नाशकात जिल्हा क्रीडासंकुल उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. ज्या जिल्ह्यात विभागीय क्रीडासंकुल आहे, तेथील प्रशासनाकडून जर जिल्हा क्रीडासंकुलाचाही प्रस्ताव आला तर त्यास मंजुरी देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याने नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरील जिल्हा क्रीडासंकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होऊ शकणार आहे.

राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार महाराष्ट्रातील नऊ विभागांमध्ये विभागीय क्रीडासंकुले उभारण्यात आली आहेत. तसेच, ज्या जिल्ह्यांच्या ठिकाणी विभागीय क्रीडासंकुल नाही, तेथे जिल्हा संकुलेदेखील उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यामुळे विभागीय क्रीडासंकुले असणार्‍या जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा क्रीडासंकुलासाठी स्वतंत्र निधी दिला जात नव्हता. त्यामुळे आतापर्यंत विभागीय क्रीडासंकुले असलेल्या नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, कोकण आणि मुंबईत जिल्हा क्रीडासंकुल साकारणे शक्य झाले नव्हते.

केवळ पुण्याचा अपवाद : पुण्यात विभागीय क्रीडासंकुल असतानाही बारामतीमध्ये जिल्हा क्रीडासंकुल उभारण्याचा अपवाद होता. मात्र, ते जिल्हा क्रीडासंकुल हे विभागीय क्रीडासंकुलासाठी मंजूर झालेल्या 24 कोटींच्या निधीमधूनच उभारण्यात आले होते. त्यामुळे अन्यत्र कुणाला विभागीयबरोबरच जिल्हा क्रीडासंकुलदेखील उभारायचे असेल तर त्या 24 कोटींच्या निधीतूनच बांधावे, असे राज्याच्या विद्यमान अर्थमंत्र्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच नाशिकसह अन्य ठिकाणच्या जिल्हा क्रीडासंकुलाच्या उभारणीचे काम लांबणीवर पडले होते.

तत्त्वत: मंजुरीमुळे मिळू शकणार निधी : महानगरांचा वाढता विस्तार पाहता राज्य शासनाने विभागीय क्रीडासंकुले असलेल्या जिल्ह्यातही जिल्हा क्रीडासंकुले उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिल्याने जिल्हा क्रीडासंकुलांसाठी स्वतंत्र निधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जिल्हा क्रीडासंकुल उभारणीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.