आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुले बांधण्याकडेच लक्ष; खेळाडू घडविण्याचा विचारही नाही..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महानगरातील क्रीडा संकुले म्हणजे पांढरे हत्ती झाले आहेत. त्यातही सिडकोचे संभाजी स्टेडियम आणि नव्याने उभारणीस परवानगी लाभलेल्या जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमची अवस्था तर अत्यंत बिकटच आहे. कुठल्या सोयी सुविधात तर नाहीतच पण मैदानांचीही दयनिय अवस्था झाल्याचे चित्र आहे.
संभाजी स्टेडियम हेच महापालिकेच्या अखत्यारीत असून त्याचीच दुर्दशा झाली आहे. तसेच शिवाजी स्टेडियमवरच जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीला राज्य शासनाने मान्यता दिल्याने तो आठ कोटींचा निधी मिळून या स्टेडियमचे काम मार्गी लागू शकणार आहे, तर विभागीय क्रीडा संकुल गत चार वर्षांपासून अद्याप निर्मिती अवस्थेतच असून यंदा वर्षी त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अर्थात ही दोन संकुले जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत असून तिथे सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन होत असल्याने निदान त्यांचा वापर तरी होत आहे.
महापालिकेचे एकमेव क्रीडासंकुल झालेय उजाड
सिडकोतील आठ एकर जागेवर त्यावेळी सुमारे 3 कोटींहून अधिक निधीसह बांधलेले राजे संभाजी स्टेडियमची अवस्था दयनीय आहे. या मैदानाचा उपयोग केवळ स्थानिक रबरी आणि टेनिसबॉलवर क्रिकेट खेळणार्‍यांना होतो. त्यामुळे क्रीडासंकुलाची उभारणी केलीच कशासाठी असा सवाल त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे,तर तेथील हॉल आणि खेळांसाठीच्या जागांची दुरवस्था तर आता डागडुजीच्याही पलीकडे पोहोचली आहे.
बांधकामांच्या पुढचा विचार व्हावा
क्रीडासंकुले बांधण्यापुरताच विचार न करता त्यापुढे त्यांचा उपयोग खेळाडू घडविण्यासाठी कसा होऊ शकेल, या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा ही क्रीडासंकुले म्हणजे जीर्ण अवशेष इतकेच त्यांचे अस्तित्व उरणार आहे.
-मंदार देशमुख , क्रीडासंघटक
नियमित उत्पन्न निर्मितीचे स्रोत असावेत
महानगरातील सर्व संकुलांना त्यांची वार्षिक देखभाल राखणे शक्य होण्याइतके उत्पन्नाचे स्त्रोत त्या जागेतच महापालिकेने उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. पुण्यातील बालेवाडीप्रमाणे तिथे काही क्रीडा संघटनांना नियमित भाडेकरारावर जागा देणे, विविध स्पर्धांसाठी जागा देताना भाडेआकारणी किंवा एखादा हॉल सणसमारंभासाठी वेगळा काढून त्यातून मिळणारे उत्पन्न मिळविता येऊ शकते.
खेळाडूंना नोकरी देतानाच मूल्यांकनही व्हावे
महापालिकेने विविध खेळांमधील राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना आणि मार्गदर्शकांना संधी देतानाच त्यांच्यावर त्या - त्या खेळातील खेळाडू निर्माण करण्याची जबाबदारी देणेदेखील आवश्यक आहे. तसेच दरवर्षी खेळाडू घडविण्याच्या प्रयासांचे मूल्यांकन होणेदेखील आवश्यक आहे. मूल्यांकन केल्यास खेळाडू किंवा प्रशिक्षक म्हणून नोकरी लाभलेल्यांना त्यांची प्रतिभा सिद्ध करणे अत्यावश्यक होणार आहे.