नाशिक - नाशिक शहरात तीन वर्षांतील सर्वाधिक तपमानाची (४०.५ अंश सेल्सिअस) शुक्रवारी नोंद झाली. किमान तपमान २२.८ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. गुरुवारी कमाल तपमान ४०.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. यात वाढ होऊन प्रथमच ४०.५ इतकी वाढ झाली. यापुढील काळात आणखी तपमान वाढीची शक्यता आहे.
उष्णतेमुळे नागरिक हैराण होत असल्याचे रस्त्यावर रोडावलेल्या संख्येवरून निदर्शनास आले. नागरिकांनी तहान भागवण्यासाठी शीतपेय आणि आइस्क्रीमच्या दुकानांचा सहारा घेतला. ज्यूस सेंटरवरील गर्दीत वाढ झाल्याचेही निदर्शनास येत होते. पायी जाणार्या नागरिकांनी छत्र्यांचा, तर दुचाकीवरून जाणार्यांनी वृक्षांच्या सावलीत गारवा मिळविण्याचा प्रयत्न केला.