आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये \'शक्ती मिल\' होण्याची शक्यता, बंदुकीचा धाक दाखवत जोडप्याला लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अध्यात्माचा वास असलेल्या शांत, निवांत अशा तपोवनात प्रेमी युगुलांचे भटकणे नवीन नाही. त्यामुळेच येथील चोरट्यांना, गुंडांना आयतीच शिकार मिळते. शनिवारी मात्र, प्रेमी युगुल आणि लुटारू यांच्या झटापटीत गोळीबार झाला अन् हा परिसर पुन्हा चर्चेत आला. चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत केलेले हे कृत्य पाहता मुंबईतील ‘शक्ती मिल’सारखी घटना डोळ्यासमोर येते. येथे सुदैवाने तसे काही घडले नसले तरी प्रेमी युगुलाला लुटताना झालेल्या गोळीबारामुळे परिसरावर चिंतेचे सावट आहे. त्याच्या प्रत्यक्ष पाहणीचा हा आढावा..


तपोवन परिसरात फिरणार्‍या प्रेमी युगुलास दोघा जणांनी बंदुकीचा धाक दाखवत, हवेत गोळी झाडून मोबाइल आणि कॅमेरा लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. दोघा संशयितांच्या मागावर पोलिसपथक तैनात करण्यात आले असून मोबाइल लोकेशनच्या आधारे शोध सुरू झाला आहे. गोळीबाराच्या प्रकाराने शांत तपोवन परिसरात पुन्हा एकदा घबराट पसरली.

नाशिकरोडमधील एका शाळेत मानधनावर शिक्षिका असलेली तरुणी व महावीर तंत्रनिकेतन महाविद्यालयातील एक तरुण शनिवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान दुचाकीने तपोवन परिसरात फिरण्याकरिता आले होते. राम-सीता-लक्ष्मणाच्या शिल्पाजवळील एका झाडाखाली ते बसले असताना दोन लुटारुंनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर एकाने एअरगन काढून डोक्याजवळ लावून धमकावले. त्यात झटापट होऊन फायर झाल्याने मोठा आवाज आला. संशयितांनी तरुणाचा मोबाइल आणि कॅमेरा घेऊन पळ काढला. काही वेळातच पंचवटी पोलिस ठाण्याचे गस्तीपथक फायरच्या आवाजाच्या दिशेने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत लुटारू फरार झाले. पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, संदीप दिवाण, सहायक आयुक्त गणेश शिंदे, पंकज डहाणे, बाजीराव भोसले, सुभाष डौले, रमेश पाटील यांनी तत्काळ दाखल होत तपासाची सूत्रे फिरवली. भद्रकाली पोलिसांत जबरी लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मोबाइलच्या आधारे काठे गल्ली येथे लोकेशन मिळाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेची खबर मिळताच पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाल्याचे निदर्शनास आले. आडगावसह पंचवटी, उपनगर पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांसह कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या तिन्ही युनिटचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन शहराच्या विविध भागांमध्ये नाकेबंदी केली. तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचे छायाचित्र घटनेतील प्रेमी युगुलास दाखवून ओळख पटविण्याचा प्रयत्नही सुरू होता.

पुढील स्लाइडमध्ये, युवकाने कथन केली घटना