आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीविरुद्ध सोमवारपासून नाशिकमधील व्यापा-यांचा बेमुदत बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक संस्था कर (एलबीटी) जाचक असल्याची भूमिका घेत तो रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत बंदचा निर्णय व्यापारी संघटनांनी गुरुवारी जाहीर केला. हा कर ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरणार असल्याचे मत मांडत बंदच्या निर्णयाला विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी एकमताने सहमती दिली.

एलबीटीविरोधात आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी शहरातील व्यापारी संघटना प्रतिनिधींची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मसच्या बाबुभाई राठी सभागृहात मोहन गुरुनानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ते म्हणाले, ‘‘दैनंदिन उलाढाल 822 रुपये असणार्‍यांनाही एलबीटीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. कर देण्यास विरोध नाही; मात्र करप्रणालीत पारदर्शकता हवी. व्यापार्‍यांना गुन्हेगार मानूनच कररचना केली जात असून हे घटनाबाह्य आहे. राज्य सरकार तीन लाख कोटींनी तोट्यात आहे. त्याची तोंडमिळवणी करण्यासाठी नवा कर लादला जात आहे.

चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले की, जाचक तरतुदी बदलण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी केली असली तरी अपेक्षित बदल नाही. एकत्रित कर प्रणाली लवकरच येणार असेल तर एलबीटीची गरजच नाही. आताच या करप्रणालीला कडाडून विरोध केला नाही तर व्यापार्‍यांना नेहमीचाच त्रास सुरू होईल.

एलबीटीतून इन्स्पेक्टर राज येणार असून एलबीटीतील तरतुदी व्यवसायाला मारक असल्याने शंभर टक्के बंद पाळावा, असे आवाहन नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी केले.

चेंबरचे कार्यकारिणी सदस्य राजेश राठी, गिरीश येवला, अरुण जातेगावकर, विजय कुलकर्णी, दिलीपसिंह बेनिवाल, राजन दलवानी, सतीश सिरोंजकर, मदन पारख, अशोक तापडिया, सुनील कासार आदी उपस्थित होते. धान्य, किराणा, सिमेंट, संगणक, ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्ट, तसेच लघुउद्योजकांच्या अनेक संघटनांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. त्यांनी बंदला सक्रीय पाठिंबा दिला.

यांनी दिला पाठिंबा
स्टेशनर्स असोसिएशन, नाशिकरोड देवळाली र्मचंटस् असोसिएशन, नवीन नाशिक धान्य व्यापारी असोसिएशन, नाशिकरोड जेलरोड व्यापारी संघटना, सातपूर व्यापारी चेंबर, कॉम्प्युटर्स असोसिएशन ऑफ नाशिक, ट्रॅव्हल अँण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हार्डवेअर अँण्ड ट्रेड र्मचंटस् असोसिएशन, लघु उद्योग भारती, सिमेंट व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस आदी.