आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वारांची काठेगल्लीत ‘धूम’;

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- द्वारका व काठेगल्ली परिसरात काही युवक दुचाकी ‘धूम स्टाइल’ने चालवत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात दुचाकीस्वारांची चांगलीच रायडिंग सुरू असते. परिसरात अनेक शाळा, क्लासेस, दवाखाने व उद्याने असल्याने या परिसरात नेहमीच वर्दळ असते. यातच, वेगाने दुचाकी चालविल्या जात असल्याने या भागात अपघातांची मालिका सुरू आहे. अपघाताच्या भीतीने परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून परिसरात वाटचाल करावी लागत आहे.

द्वारका, काठेगल्ली, शंकरनगर या भरवस्तीतील भागात रोज दुपारी व सायंकाळच्या सुमारास दुचाकीस्वारांची सर्रास रायडिंग सुरू असते. या ठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यातूनच मोठय़ाने हॉर्न वाजवत दुचाकीस्वार ‘धूम स्टाइल’ने वाहने चालवित असतात. या भागातील छोट्या-मोठय़ा अपघातांस हे दुचाकीस्वार कारणीभूत ठरत असतात. परिसरात असणार्‍या शाळा व क्लासमधील विद्यार्थ्यांना या भागातून तारेवरची कसरत करत वाटचाल करावी लागते. त्यातूनच अनेकदा दुचाकीस्वार व नागरिक यांच्यात वाद निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंग घडत असतात. परिसरातील नागरिकांना वेगातील दुचाकीस्वारांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहतूक नियमांची पायमल्ली करणार्‍या दुचाकीस्वारांमुळे या भागात अशांतता पसरत आहे.

भरवस्तीत वेगाने दुचाकी चालवणार्‍या युवकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वाहतूक पोलिस नेमा
परिसरात मोठय़ा प्रमाणात दुचाकीस्वार वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे बर्‍याच वेळा अपघात घडत असतात. कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून दुचाकीस्वारांवर कारवाई करावी.
-प्रशांत अहिरे, नागरिक

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
शाळेच्या वेळेतच दुचाकीस्वार वेगाने वाहने चालवत असतात. त्यामुळे अपघात घडल्यास कोणास जबाबदार धरावे?
-उदय पाटील, नागरिक