आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘खेळ मांडला’ जीवघेणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रामवाडीतील उदय कॉलनी परिसरात महापालिका निवडणुकीपूर्वी घाई गडबडीत बांधण्यात आलेल्या उद्यानातील खेळणी परिसरातील चिमुकल्यांच्या जिवावरच बेतणारी ठरू शकते, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. निवडणुकीपुरते झटपट काम केल्यानंतर या उद्यानाकडे ढुंकूनही बघायला महापालिकेच्या उद्यान विभागातील संबंधितांसह लोकप्रतिनिधींनाही फुरसत मिळालेली नाही.
रामवाडीच्या बच्छाव हॉस्पिटलमागे असलेल्या नाल्यानजीकच्या मोकळ्या जागेत ऐन निवडणुकीपूर्वी घसरगुंडी, झोके आणि तत्सम खेळणी आणून बसवण्यात आली. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे काम झटपट उरकून घेण्यात आले. परंतु, त्या उद्यानात ना झाडे, ना हिरवळ. उद्यान म्हणजे केवळ खेळणी असेच बहुदा संबंधित यंत्रणेला वाटले असावे. प्रत्यक्षात निवडणूक पार पडून चार महिने उलटले तरी या परिसरात टाकण्यात आलेला विटांचा ढीग आणि उद्यानातील मंदिराच्या उघड्या पडलेल्या सळ्या असे दृश्य कायम आहे. उद्यानात खेळणी बसवण्यात आल्याने आसपासच्या परिसरातील बालके या उद्यानात खेळायला जातात. मात्र, जरा जरी चूक झाली आणि एखाद्या बालकाला काही गंभीर दुखापत झाली किंवा त्याच्या जिवावर बेतले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? नेहमीप्रमाणे दुर्घटना घडेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणारी यंत्रणा या उद्यानाबाबतही तशीच निर्धास्त आहे.
तसेच, संबंधित उद्यान हे महापालिका निवडणुकीत अतिसंवेदनशील ठरलेल्या रामवाडी परिसरात असल्याने या उद्यानाच्या जीवघेण्या स्थितीबाबत बोलण्यास नागरिकदेखील कचरतात. मात्र, दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणेने या उद्यानाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.